व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विभागाचे अधिवेशन उत्साहात

राज्यातील साप्ताहिक संपादक-पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग

महत्त्वाच्या विषयावर घेतले ठराव, राज्यशासनाकडे करणार सुपूर्द

साप्ताहिकाच्या संपादक, पत्रकारांना न्याय मिळेपर्यंत लढणार : संदीप काळे

छत्रपती संभाजीनगर,१९ जून / प्रतिनिधी :-  ‘कोरोना आणि त्यानंतर पत्रकार व पत्रकारितेच्या जगात मोठी स्थित्यंतरे आली आहेत. पत्रकारितेचे जगही ढवळुन निघाले आहे. अशात साप्ताहिकातील पत्रकारांच्या आयुष्यात व्यापक बदल घडावे, त्याचे राहणीमान उंचवावे म्हणून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही संघटना लढत आहे. जोपर्यंत साप्ताहिकातील शेवटच्या घटकातील पत्रकाराला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही’, असे ठाम प्रतिपादन ‘व्हॉईस ऑफ’ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या साप्ताहिक विभागाचे अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे  उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम एमजीएम संस्थेच्या विनोबा भावे हॉलमध्ये पार पडला. या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजर्षी शाहु परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी, ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत निशिकांत भालेराव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पानसरे, ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ रेडिओ विभागाचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब घोडे, व्हॉईस ऑफ मीडिया मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, व्हॉईस ऑफ मीडिया मराठवाडा विभागाचे सरचिटणीस शेखलाल शेख, पत्रकार तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बनकर पाटील, व्हॉईस ऑफ मीडियाचे वाशिम जिल्हाध्यक्ष भागवतराव मापारी आदी मान्यवर होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे उद‌्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना संदीप शेळके म्हणाले की, सकारात्मक पत्रकारितेची आज समाजाला गरज आहे. पत्रकार समाजाच्या समस्या सोडवितात. परंतु त्यांच्या समस्यांकडे आजपर्यंत कुणी लक्ष दिले नव्हते. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून हे चित्र निश्चित बदलेले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साप्ताहिक विंगच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र,  नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के म्हणाले की, पत्रकारांनी अनेक नेते घडविले. परंतु आज त्यांनाही पत्रकारांचा विसर पडला आहे. पत्रकारांची परिस्थिती सुधारण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मात्र या लढ्यात सामूहिक प्रयत्न गरजेचे आहे. ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत निशिकांत भालेराव यांनी पत्रकारांनी माहिती व तंत्रज्ञनाच्या बाबतही ‘अप टु डेट’ राहणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार त्यांनीही लेखनशैली बदलावी असे मत त्यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्यासाठी संदीप काळे यांना शुभेच्छा दिल्या. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारणे गरजेचे होते, असे ते म्हणाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बनकर पाटील यांनी लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार व पत्रकारितेला सशक्त ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. हे सशक्तीकरण व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी यांनी पत्रकारितेत बदलत्या काळानुसार झालेल्या परिवर्तनाची माहिती दिली व भविष्यातील पत्रकारितेचा वेध घेतला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ‘साप्ताहिकाची सद्य:परिस्थिती आणि त्यावर उपाययोजना’ या विषयावर परिसंवाद पार पडला. यामध्ये  वामन पाठक, नेमीनाथ जैन, गोपाल कडुकर, संदीप पिंपळकर यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांनी केले.अधिवेशनाचे सूत्रसंचालन व्हॉईस ऑफ मीडिया रेडिओ विभागाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सचिन मेनकुदळे यांनी केले. आभार व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विभाग छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष अब्दुल कय्युम अब्दुल रशीद यांनी मानले.

१५ जणांना पत्रमहर्षी राज्य भूषण पुरस्कार

यावेळी राज्यातील साप्ताहिकाच्या १५ संपादक, मालक, पत्रकारांना साप्ताहिक पत्रमहर्षी राज्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शांताबाई सत्यभान मोरे, काकासाहेब गुटे, संजय निकस पाटील, डॉ. भारती मढवई, वैशाली दीपक चवरे, विकास अनिलकुमार बागडी, सुरेश गुलाबराव क्षीरसागर, सुरेखा सोमनाथ सावळे, राजेश लवणकर, अनुपकुमार भार्गव, के.डी.वर्मा, मुशीरखान कोटकर, सुनिल भालचंद्र देशमुख, सुनिल पवार यांना देण्यात आला.

हे ठराव झाले मंजूर

साप्ताहिकाना द्यावा लागणारा जीएसटी रद्द करावा. साप्ताहिकाच्या संपादक, पत्रकार यांना शासकीय पत्रकार परिषदेला आमंत्रित करावे. शासनाच्या जाहिरात रोस्टरचे प्रत्येक जिल्ह्यात तंतोतंत पालन व्हावे. दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनासुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती मिळाव्यात. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची साप्ताहिकांसाठीची लेव्ही फी रद्द करावी.विधानभवनात अधिवेशन चालू असताना दैनिकांप्रमाणेच अधिस्वीकृतीधारक साप्ताहिकाच्या संपादक-पत्रकारांना प्रवेश देण्यात यावा.अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पूर्वीप्रमाणे ठराविक अंतराची अट रद्द करुन बसचा प्रवास वातानुकूलित गाड्यांमध्येही लागू करावा. प्रत्येक जिल्ह्यांत ज्येष्ठ पत्रकारासाठी पत्रकार सन्मान योजनेचे तंतोतंत पालन व्हावे. ग्रामीण भागातील वार्ताहार जे पाच वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत, त्यांनाही अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. आरएनआय नसलेल्या परंतु रजीस्ट्रेशन असलेल्या साप्ताहिकांनाही पोस्ट सवलत लागू करावी. केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनानेसुद्धा दर्शनी जाहिराती या 800 चौरस सेंटीमीटर या आकारात द्याव्यात, कारण केंद्र शासनाच्या बऱ्याचशा जाहिराती या अर्धे पान असतात. ज्येष्ठ पत्रकार व पेन्शनसाठी असलेल्या अटी शिथिल करण्यात याव्यात. पत्रकारांच्या यादीची जिल्हा माहिती कार्यालयाकडे नोंद असावी. दरवर्षी ही यादी अपडेट करावी. लघु पत्रकारांसाठी इतर राज्यांनी अवलंबलेल्या पत्रकार योजना महाराष्ट्रात कार्यान्वित कराव्यात. हे ठराव एकमताने घेण्यात आले ज्या बाबत शासनाकडे लवकरच मिटिंग घेण्यात येणार आहे.