उद्धव ठाकरेंसाठी भाजपची दारे बंदच!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेंनी केले स्पष्ट

मुंबई ,१७ जून /प्रतिनिधी :-उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना “उद्धव ठाकरेंसाठी भाजपची दारे उघडीच आहेत,” असे वक्तव्य केले होते. त्यावर राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले असताना भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ‘उद्धव ठाकरेंसाठी भाजपची सारी दारे बंद आहेत’, असे शुक्रवारी स्पष्ट केले.

मौर्य यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र भाजपने त्यांची अधिकृत भूमिका शुक्रवारी मांडली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘केशव प्रसाद मौर्य यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. उद्धव ठाकरेंकरिता आमचे सारे दरवाजे बंद आहेत. आम्ही त्यांच्याशी कोणतीही चर्चा करत नाही, त्यांच्याशी कधीही, कुठलीही चर्चा करणारच नाही’.

यावेळी बावनकुळे म्हणाले, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने जे काही केले (कर्नाटक सरकारने धर्मांतरविरोधी कायदा रद्द केला आहे, तसेच अभ्यासक्रमातून वीर सावरकरांचा धडाही वगळला आहे.) आहे, त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडावी. किमान त्यांच्या मुखपत्रातून त्यांनी याबाबतची भूमिका उद्या छापली पाहिजे. कर्नाटकात काँग्रेस जे काही करतंय त्याबद्दल उद्धव ठाकरेंची भूमिका महाराष्ट्राला समजली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.