न्यायाधीश पद म्हणजे सामाजिक दायित्व-न्यायमुर्ती भूषण गवई

छत्रपती संभाजीनगर , १७ जून / प्रतिनिधी :- न्यायाधीश पद हे सामाजिक दायित्व आहे. वकीली सोडून देशाची व समाजाची सेवा करण्यासाठीच हे पद स्वीकारले जाते. प्रत्येक न्यायमूर्ती हा न्याय करण्यासाठीच सामाजिक जाणीव ठेऊन काम करीत असतो. मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनीही याच जाणीवेतून परिश्रमपूर्वक आणि निष्ठापूर्वक आपले कर्तव्य निभावले असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.


छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठातील वकील संघाचे एकेकाळचे सदस्य असलेले न्यायमूर्ती प्रसन्न वराळे चेन्नई येथील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाल्याबद्दल आणि कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याबद्दल संजय गंगापूरवाला यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठ वकील संघाच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी न्यायमूर्ती गवई बोलत होते.
ते म्हणाले, खंडपीठ हे जिल्हा न्यायालयाचेच विस्तारित स्वरुप असल्याच्या टिकेस उत्तर देण्याचे काम मुख्य न्यायमूर्तींंच्या सत्कारातून झाले आहे. खंडपीठाच्या स्थापनेसाठी आंदोलन झाले, प्रयत्न झाले त्या सर्वांचाच हा सत्कार आहे. दोघे मुख्य न्यायमूर्तींनी कठोर परिश्रम आणि सामाजिक जाणीवेतून या पदापर्यंत पोहोचले आहेत. एकाच वेळी दोन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी पोहोचणे ही या खंडपीठासाठी व येथील वकील संघासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. या बारचे भवितव्य अतिशय उज्वल आहे.
व्यासपीठावर प्रमुख पाहूणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमूर्ती भूषण गवई, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, चेन्नई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार, छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालय खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रविंद्र घुगे, राजस्तान उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संभाजी शिंदे, गीता प्रसन्न वराळे, संगीता संजय गंगापूरवाला, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड्. नितीन चौधरी, सचिव अ‍ॅड्. सुहास उरगुंडे, अ‍ॅड्. निमा सूर्यवंशी, अ‍ॅड्. अभयसिंह भोसले यांची उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, वडिलांचे मार्गदर्शन, जेष्ठंनी वेळोवेळी दिलेली प्रेरणा आणि दिलेला धीर यातून आपल्याला या पदापर्यंत पोहोचता आले. येथील बार, वकील संघातील जेष्ठ वकिलांनी अनेक उच्च परंपरा निर्माण केल्या आहेत. आज या पदावर पोहोचण्यात या बारचे अतिशय महत्वाचे योगदान आहे. गोरगरीबांना न्याय देण्यासाठी आणि वंचितांपर्यंत न्याय पोहोचविण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या खंडपीठाच्या स्थापनेमागचा उद्देश नक्कीच सफल झाला असे म्हणता येईल.
मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी म्हटले की, बालपणापासूनच वडिलांकडून साहित्यिक वारसा लाभला. वाचनाची आवड निर्माण झाली.  वेळोवेळी जेष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आजचा टप्पा गाठता आला. येथील जेष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि प्रयत्नांनी उत्तम वकील निर्माण झाले. त्यातुनच गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न झाला आहे.  
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार म्हणाले, तळागाळातील समाजाबद्दल आपुलकी आणि अन्यायाबद्दल चीड हे मुख्य न्यायमूर्ती वराळे आणि गंगापूरवाला यांचे समान गुण आहेत. आपल्या भिन्न शैलीतून मराठवाड्यातील जनतेला त्यांनी जे न्यायदान केले त्याची तुलना करता येणार नाही.
प्रारंभी सर्व अतिथींचा विशेषत: मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांचा वकील संघाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि विठ्ठल रुख्माईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावरील सर्व अतिथींचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. यावेळी वकील संघाचे सदस्य जेष्ठ विधिज्ज्ञ आर एन धोर्डेपाटील, माजी सचिव शहाजी घाटोळ पाटील, अ‍ॅड्. राजेंद्र गोडबोले, अ‍ॅड्. रामेश्वर तोतला, अ‍ॅड्. श्रीकांत अदवंत, केंद्र सरकारचे अधिवक्ता अ‍ॅड्. संजीव देशपांडे व अ‍ॅड्. व्ही डी सपकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास उच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्ती, मनपा प्रशासक जी श्रीकांत, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यासह वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष नितीन चौधरी यांनी केले. सुत्रसंचलन अ‍ॅड्. नेहा कांबळे यांनी केले तर आभार वकील संघाचे सचिव अ‍ॅड्. सुहास उरगुंडे यांनी मानले.

(छायचित्रे -चंद्रकांत थोटे )