किराडपुरा दंगलीत ४३ दंगेखोरांना अटक;२९ आरोपी हे अद्यापही पोलिस कोठडीत

छत्रपती संभाजीनगर,४  एप्रिल / प्रतिनिधी :-  किराडपुरा भागात झालेल्या दंगलीतील आणखी दोन आरोपींच्‍या विशेष तपास पथकाने सोमवारी (दि.३) रात्री मुसक्या आवळल्या. दोन्‍ही आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, पोलिसांनी आरोपींना न्‍यायालयीन कोठडीत पाठविण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली होती. विनंती मान्‍य करुन प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी जी.डी. गुरनुले यांनी दोन्‍ही आरोपींची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत केली.

शेख अश्‍पाक शेख मुसा (३०) आणि शेख जावेद शेख कलीम (२९, रा. शहागंज) अशी आरोपींची नावे आहेत.छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तरुणांच्या दोन गटात गुरुवारी २९ मार्च रोजी  पहाटे दोन वाजेच्या सुमारास बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार, अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता. या दंगलीनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत श्रीराम नवमीचा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडला होता. प्रकरणात जिन्‍सी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

गुन्‍ह्यात आतापर्यंत ४३ दंगेखोरांना पोलिसांनी अटक करुन न्‍यायालयात हजर केले आहे. त्‍यातील १४ जणांची पोलिस कोठडी नंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे. तर २९ आरोपी हे अद्यापही पोलीस कोठडीत आहे.