राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर

राज्यातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष ‘या’ दिवशीपासून सुरू होणार

मुंबई : राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी ११ जूनपर्यंत असणार आहे. तर नवीन शैक्षणिक वर्ष सोमवार, १२ जूनपासून सुरु होणार आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

मात्र विदर्भातील उन्हाचा तडाखा पाहता यामध्ये काहीसे बदल करण्यात आले आहे. विदर्भातील नविन शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या चौथ्या सोमवार पासून म्हणजेच २६ जून पासून सुरू होणार आहे.

तसेच कोकणात पावसाळ्यात सुट्टी द्यावी लागते. त्यामुळे शाळांमधून उन्हाळी किंवा दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून नाताळ किंवा गणेशोत्सव दरम्यान समायोजन करण्याचे अधिकार शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने देण्यात येणार आहे.

असे असले तरी शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या ७६ पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे सुद्धा परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.