कचनेर चिंतामणी पार्श्वनाथ जैन मंदिरातील सोन्याच्या मूर्तीच्या चोरीप्रकरणी अनिल विश्वकर्माचा जामीन मंजूर

छत्रपती संभाजीनगर ,३०  एप्रिल / प्रतिनिधी :-कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातील पार्श्वनाथ भगवंतांची २ किलो ५६ ग्रामची सोन्याची मूर्ती चोरल्या प्रकरणी एक आरोपी अनिल भवानीदिन विश्वकर्मा याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी पी शर्मा यांनी सशर्थ मंजूर केला.
२४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी कचनेर येथील जैन मंदिरातील सोन्याची मूर्ती बदलल्याचे आढळून आले होते. मंदिराचे विश्वस्त विनोद लोहाडे यांनी अज्ञात व्यक्तींनी मूर्ती बदलल्याची फिर्याद दिली होती. त्यावरुन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले व त्याठिकाणी वारंवार येणार्‍या अर्पित नरेंद्र जैन आणि तेथील एक स्वयंसेवक अनिल विश्वकर्मा यांना अटक केली. उपलब्ध पावत्यांच्या आधारे पोलिस  संबंधित ज्वेलर्सपर्यंत पोहोचले आणि मूर्ती वितळवून त्याच्या सोन्याच्या केलेल्या लगडी जप्त केल्या. एकुण २ किलो ५६ ग्राम सोन्यापैकी १ किलो ८५४ ग्राम सोने जप्त केले. ते मंदिराला परत करण्यात आले. तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले.
दरम्यान अनिल विश्वकर्मा याने तीन वेळा जामीन अर्ज दाखल केले. तिन्ही वेळा तपास चालू आहे, गुन्हा गंभीर आहे, दोषारोपपत्र दाखल केल्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही, तपासात प्रगती होत आहे अशी निरिक्षणे नोंदवत न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळले. त्यानंतर आता चौथ्यावेळी पुन्हा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.
अ‍ॅड्. अक्षय राडीकर यांनी अनिल विश्वकर्मा यांची बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, चोरीची घटना दिवसा गर्दीत घडणे शक्य नाही. ती रात्रीच झालेली असावी. यात विश्वस्तांच्याच व्यवस्थापनात काहीतरी गोंधळ झालेला दिसतो. फिर्याद ही अज्ञात व्यक्तींविरुध्द आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त हात दिसतात, चेहरा दिसत नाही. ज्वेलर्सकडून सोन्याच्या मोबदल्यात घेतलेल्या पावत्यांवर फक्त आरोपी क्रमांक एकचेच नाव आहे. विश्वकर्माचे नाही. चोरी, विक्री, पैसे घेणे यात कुठेही विश्वकर्माचा संबंध येत नाही. मंदिराला बहुतांश सोने परत मिळालेले आहे त्यामुळे पोलीस कोठडी गरजेची नाही.
सरकारी वकिलांनी मात्र जामीन मंजूर करण्यास विरोध केला. त्यांचे म्हणणे होते की, मूर्ती चोरल्याचा प्रत्यक्ष पुरावाच उपलब्ध आहे. मूर्ती तब्बल एक कोटी रुपये किमतीची होती. आता सुनावणीच्या काळात जामीन झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. न्यायालयाने उभय युक्तीवाद ऐकल्यानंतर असे निरिक्षण नोंदवले की, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्र मर्यादेतील हे प्रकरण आहे. गुन्हा जास्तीत जास्त तीन वर्षे शिक्षेचा आहे. आरोपी ४ ते ५ महिन्यापासून आत आहे.  दोषारोपपत्र दाखल आहे. मुद्देमाल जप्त आहे. चोरीच्या वस्तुची किंमत हा काही जामीन रद्द करण्याचा मुद्दा असू शकत नाही. सरकारी वकीलांचे म्हणणे लक्षात घेता काही अटी टाकून जामीन करता येईल, असे म्हणत न्यायालयाने ५० हजार रुपायाच्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर करताना आरोपीने साक्षीदारांना फितवू नये, अशा स्वरुपाचा गुन्हा पुन्हा करु नये, सुनावणीला नियमित हजर रहावे, स्वत:चा इमेल आयडी, मोबाईल नंबर, पॅनकार्ड, आधारकार्ड, कायमचा पत्ता, स्थावर मालमत्ता आदिंची माहिती जामीनपुर्वी नमूद करावी अशा अटी टाकल्या व जामीन मंजूर केला.