पोलिसांना लुटमार करण्‍याचा प्रयत्‍न:पाच चोरट्यांना पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर ,३०  एप्रिल / प्रतिनिधी :-सुपा (बारामती) येथून गुन्‍ह्याच्‍या तपासाहून जालन्‍याकडे परतणाऱ्या  साध्‍या कपड्यांवरील पोलिसांना लुटमार करण्‍याचा प्रयत्‍न झाला. ही घटना शनिवारी दि.२९ रात्री साडे आठवाजेच्‍या सुमारास औरंगाबाद-जालना रस्‍त्‍यावरील करमाड येथील गोल्डी ढाब्याजवळ घडली.

या प्रकरणात जालना पोलिसांनी एका चोरट्याला जागीच पकडून ठेवले होते. तर उर्वरित चार चोरट्यांना करमाड पोलिसांनी अवघ्‍या काही तासातच बेड्या ठोकल्या. पाचही चोरट्यांना २ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.आर. देवरे यांनी रविवारी  दिले.तौखीर खालेक शेख (२९, रा. बोरी ता.जिंतुर जि. परभणी ह.मु. अंबिकानगर, मुकुंदवाडी), अथर काझी अन्‍वर काझी (३०, रा. विद्यानगर, परभणी), शेख इम्रान शेख अखिल (२७, रा. अमिन कॉलनी, परभणी), रहीमखॉं नुरखॉं पठाण (३०, रा. मदिनानगर, परभणी) आणि आत्माराम मुंजाराम उकांडे (२७, रा. एसटी कॉलनी, मुकुंदवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात तालुका जालना पोलिस ठाण्‍यातील उपनिरीक्षक सय्यद मजित सय्यद फतरु (५७) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादी हे पथकासह एका गुन्‍ह्याच्‍या तपासासाठी खासगी वाहनाने सुपा (बारामती) येथे गेले होते. २९ एप्रिल रोजी तपासाचे काम संपवून ते औरंगाबादमार्गे जालन्याकडे परतत होते. विशेष म्हणजे फिर्यादी हे एकटे गणवेशात होते, व उर्वरित कर्मचारी साध्‍या कपड्यांवर होते. रात्री साडे आठ वाजेच्‍या सुमारास औरंगाबाद-जालना रोडवील करमाड येथील गोल्डी ढाब्या जवळ फिर्यादीचे वाहन आले असता, तीन व्‍यक्ती एका दुचाकीवर आले, त्‍यांनी फिर्यादीच्‍या वाहनाला थाप मारल्याने, वाहन चालकाने वाहनाची गती कमी केली. तिघांनी दुचाकी वाहना समोर उभी केली, त्‍यामुळे वाहन चालक तथा हवालदार संदीप बेरडे यांनी वाहन रोडच्‍या कडेला लावली. त्‍याचवेळी आणखी एका दुचाकीवर दोन जण तेथे आले. त्‍यांनी बेरडे यांना गाडी कहा जा रहे  है, तुम्हारे पास क्या है निकालो असे म्हणत बेरडे यांच्‍याशी झोंबा-झोंबी करुन त्यांच्‍या खिशातील पैसे व मोबाइल काढण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍याचवेळी फिर्यादीने वाहनामधील लाईट चालू केला, व ते एका सहकाऱ्यासह वाहनाखाली उतरले. फिर्यादीला गणेवशात पाहून चोरट्यांनी तेथून पळ काढण्‍याचा प्रयत्‍न केला, मात्र फिर्यादीने आरोपींपैकी एक तौखीर शेख याला पकडले. तर उर्वरित दुचाकी तेथेच सोडून दोन आरोपी पायी पळाले तर दोन आरोपी एका दुचाकीवर पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घडनास्‍थळ गाठले. घटनेचे गांर्भीय ओळखून करमाड पोलिसांनी अवघ्‍या काही तासातच पसार झालेल्या चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या.या  प्रकरणात करमाड पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी आरोपींना कट कोठे रचला, आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, अशा प्रकारे आरोपींनी आणखी किती गुन्हे केले आहेत. आरोपींकडून जप्‍त करण्‍यात आलेल्या दोन दुचाकी चोरीच्‍या आहेत काय याच देखील तपास बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.