मुंबईतून दहशतवाद्याला अटक!

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक विविध ठिकाणी धडक कारवाई करताना दिसत आहेत. याच दरम्यान आज मुंबईत एका ३० वर्षीय दहशतवाद्याला पकडण्यात महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाला यश आले.

मालाड येथून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव चरतसिंग उर्फ ​​इंद्रजितसिंग करिसिंग असून तो मूळचा पंजाब येथील आहे. त्याला महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून बुधवारी अटक केली. त्याला पुढील आवश्यक कारवाईसाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तो कॅनडामधील वाँटेड दहशतवादी लखबीर सिंग लांडा याच्या संपर्कात असल्याचे उघड झाले असल्याची माहिती महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने दिली.

चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग करिसिंग उर्फ कारज सिंग या दहशतवाद्याविरुद्ध ८ गुन्हे दाखल आहेत. मार्च २०२२ पासून तो पंजाबच्या कपूरथला तुरुंगातून २ महिन्यांच्या पॅरोल रजेवर बाहेर होता. त्याच्या पॅरोल कालावधीत त्याने त्याच्या साथीदारांसह पंजाब पोलिस, इंटेलिजेंस हेड क्वार्टर, मोहाली येथे ९ मे २०२२ रोजी रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला केला.