नांदूरढोकच्या विद्यार्थी व ग्रामस्थांनी वाळूच्या गाड्यांची हवा सोडून व्यक्त केला संताप

वैजापूर,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाळूचे ठेके बंद झाले असले तरी उपसा  केलेल्या वाळूची वाहतूक जोरात सुरु असून प्रशासन झोपेचे सोंग घेत त्याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वाळूच्या ओव्हरलोड गाड्यांनी तालुक्यातील गंगथडी परिसरातील आधीच दयनीय असलेले रस्ते पूर्णतः उखडून टाकले आहे. त्यामुळे संतापलेल्या नांदूरढोक येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या साथीने अखेर आज या वाळूच्या ओव्हरलोडेड गाड्या अडवून त्याच्या टायरमधील हवा सोडून देत संताप व्यक्त केला.  

तालुक्यातील बाभुळगावग॑गा येथील वाळूपट्ट्याचा लिलाव मार्च महिन्यात करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने ‘भर अब्दुल्ला गुड थैली में’ या उक्तीप्रमाणे गोदापात्रातून बेसुमार वाळूउपसा केला. याबाबत प्रशासन वाळूमाफियांच्या मुजोरीला लगाम घालू शकले नाही. त्यातच अनेकदा वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई होऊनही वाळू माफियांवर कोणताही परिणाम झाला नव्हता. उलट प्रशासन आणि पोलिस कारवाई करणार असल्याची भणक वाळूमाफियांना आणि ठेकेदारांना आधीच लागत होती. यावरही प्रशासन शेवटपर्यंत अंकुश लावू शकले नाही.अखेर हा प्रश्न असाच रेंगाळत राहिला. शेवटी पावसामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गोदापात्रातील वाळू उपसा बंद झाला. मात्र, आधी उपसा केलेल्या वाळूची उचल आणि वाहतूक करण्यास परवानगी कायम राहिली. हा ठेका ३० सप्टेंबरपर्यंत कायम आहे. याचाच गैरफायदा घेत माफिया वाळू वाहतुकीची नियमावली धाब्यावर बसून गाड्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक वाळू भरून वाहतूक करीत आहेत. दोन-तीन ब्रासची पावती आणि गाडीत मात्र 5 – 6 ब्रास वाळू भरून हायवा गाड्या खुलेआम वाहतूक करीत आहेत. मात्र, प्रशासन याबाबत झोपेचे सोंग घेत त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. प्रमाणपेक्षा अधिक वाळू भरून गाड्या वाळूची वाहतूक करीत असल्याने साहजिकच त्याचा परिणाम रस्त्यांवर होत आहे.

बाभुळगावगंगा, सावखेडगंगा, नांदूरढोकसह परिसरातील रस्त्यांची या गाड्यांमुळे चाळणी झाली आहे. आधीच पावसामुळे रस्त्यांवर चिखल झाला असून, त्यातच या ओव्हरलोडेड गाड्यांमुळे या रस्त्यांवर चालणेही अवघड होऊन बसले आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी तर चिखल तुडवत ‘स्कुल चले हम’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाच्या नजरेत ही बाब आणून देवूनही प्रशासन त्याची दखल घेण्यास तयार नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. अवघ्या चार महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यात शासनाने वैजापूर-श्रीरामपूर रस्ता दुरुस्त केला होता. मात्र, वाळूच्या ओव्हरलोडेड हायवा आणि डंपरमुळे या रस्त्याची पण दुरवस्था झाली आहे. वारंवार विनंती करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर आज नांदूरढोक ग्रामस्थांचा पारा चढला अन् त्रस्त विद्यार्थ्यांना साथ देत या रस्त्यावरून निघालेल्या वाळूच्या गाड्या अडवून त्यांच्या टायरमधील हवा सोडून देत त्या गाड्या तेथेच अडवून धरल्या. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.