वैजापूर येथे आढावा बैठकीत डॉ.कराड यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

सरकारी कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कामेच होत नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार

वैजापूर ,​२ मार्च / प्रतिनिधी :- बचत गटांना विविध उद्योग सुरु करण्यासाठी निधीची कमतरता भासू नये म्हणून बॅकांनी सीएसआरच्या माध्यमातुन निधी उभा करावा.‌ तालुक्यासाठी 90 लाख रुपयांची मागणी सीएसआरच्या माध्यमातून स्टेट बॅक ऑफ इंडियाने करावी असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी (ता.02) वैजापूर येथे पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. याशिवाय तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, प्रलंबित प्रश्न यावरुन ही कराड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. या आढावा बैठकीला सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत भाजपाच्या पदाधिका-यांनी शासकीय अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले होते.पंचायत समिती, कृषी विभाग, आरोग्य, बॅकिंग, महावितरण या सेवा क्षेत्रातील सरकारी कार्यालयात पैसे घेतल्या शिवाय कामेच होत नसल्याचा बेधडक आरोपामुळे बैठकीचे वातावरण चांगलेच तापले होते.पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीला उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी , गटविकास अधिकारी विठ्ठल हरकल यांच्यासह भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव,  तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, डॉ. राजीव डोंगरे, नबी पटेल , कैलास पवार, ज्ञानेश्वर जगताप, प्रभाकर गुंजाळ, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक शैलेश चव्हाण, राजेंद्र चव्हाण, दशरथ बनकर, मनोज नळे, नितीन तांबे यांची उपस्थिती होती. डॉ.कराड यांनी तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिका-यांची पहिलीच बैठक घेत असल्याचे सांगितले.त्यांनी पदाधिका-यांकडून आलेल्या सूचना जाणून घेतल्या.तसेच विविध शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांकडून सद्यस्थितीत सुरु असलेले प्रशासकीय कामकाजाची त्यांनी महिती घेतली.येथील सर्व शासकीय – निमशासकीय कार्यालयात त्यांनी येत्या पंधरा दिवसात बायोमेट्रिक हजेरी यंत्र लावण्याच्या सूचना त्यांनी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांना दिल्या.या बैठकीला पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद रोडगे, कृषी अधिकारी अशोक आढाव, उपअभियंता एस.बी. काकड यांच्यासह मोठयासंख्येने अधिकारी उपस्थित होते.