वैजापुरात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकून दोन लाखांचे टायर लांबविले

वैजापूर,१५ जुलै /प्रतिनिधी :- दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी  दोन लाख रुपये किंमतीचे टायर चोरून नेल्याची घटना १३ जूलै रोजी रात्रीच्या सुमारास शहरालगत असलेल्या गंगापूर चौफुलीवर  घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 तालुक्यातील शिऊर येथील राहुल जाधव  यांचे शहराबाहेरून जाणाऱ्या नागपूर-मुंबई महामार्गावरील गंगापूर चौफुलीलगत टायरचे दुकान आहे. गुरुवारी दिवसभर दुकानात थांबून ते रात्री आठ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून ते शिऊर येथे त्यांच्या घरी परतले. रात्रीचे जेवण आटोपून झोपण्याच्या तयारीत असतांना त्यांना  गाळामालक समीर वकील यांचा फोन कॉल आला. तुम्ही किरायाने घेतलेल्या गाळ्याचे शटर उचकवून चोरट्यांनी दुकानातील टायर चोरून नेल्याचे त्यांनी त्यांना सांगितले. राहुल जाधव यांनी लगेचच त्यांचा गाळा भागीदार सचिन निकम (रा. नांदगाव ) याला फोन कॉल करून घटनेची माहिती देऊन तुम्ही ताबडतोड दुकानावर जा असे सांगितले. दरम्यान तेही तत्काळ शिऊरहुन वैजापूरला आले. त्यांनी दुकानावर येऊन बघितले असता दुकानातील दोन लाख २३ हजार ६०० रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे टायर चोरी गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी राहूल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.