मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाचा दणका: शुक्रवारी  सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश

मुंबई,१३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-  अंधेरी पोट निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्वीकारण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केलेला नाही. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी झाली. यावेळी युक्तिवाद करताना ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी सांगितले की, ऋतुजा लटके यांनी 2 सप्टेंबर रोजी राजीनामा दिला. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली. नियमानुसार आम्ही आमचा राजीनामा मुंबई महापालिकेकडे सादर केला. एक महिन्याचा नोटीस कालावधी पूर्ण न झाल्यास एक महिन्याचे वेतन द्यावे लागेल, असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे एक महिन्याचा पगार जमा केल्याचे लटके यांच्या वकिलांनी सांगितले.

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचं काय होणार याबद्दल संदिग्धता होती.

ऋतुजा लटकेंवर लाच, भ्रष्टाचाराचे आरोप!

अंधेरी पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विरोधात लाच घेतल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांची चौकशी सुरू असल्यामुळे लटके यांचा राजीनामा अद्याप मुंबई महापालिकेने स्विकारलेला नाही, असे उत्तर महापालिकेने हायकोर्टात दिले.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा लिपिकपदाचा राजीनामा मुंबई महापालिकेने का स्विकारलेला नाही, असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. त्यावर उत्तर देताना पालिकेने स्पष्ट केले की, लटके यांच्यावर लाच घेतल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणांची चौकशी सुरु आहे. महापालिकेने हायकोर्टाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ऋतुजा लटकेंविरोधात एक तक्रार असून ती अद्याप प्रलंबित आहे. एका तक्रारदाराने लटकेंच्या विभागीय चौकशीची मागणी केली आहे. लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी आम्ही करत आहोत. शिवाय लायसनिंगच्या एका प्रकारात त्यांनी लाच मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे वकील युक्तीवाद करत आहेत की म्हणूनच आम्ही त्यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही.