ही युती वेगळ्या विचारांची, ‘त्यांना’ नाही कळणार:नाव न उच्चारता श्रीकांत शिंदेंचा ठाकरे गटावर

कल्याण : ‘सरकार बनणार हे एकनाथ शिंदेसाहेबांना माहित नव्हतं. मविआतील काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणून बंड केले. गेल्या ११ महिन्यात या सरकारच्या माध्यमातून जितकी कामं झाली तेवढी याआधी कधी झाली असतील असं मला वाटत नाही.’ असं म्हणत शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना सुनावले आहे. कल्याणमध्ये भरलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. या दरम्यान त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे व संजय राऊतांवर निशाणा साधला.

श्रीकांत शिंदे म्हणाले, बाहेर काही लोक सतत खोके खोके असं गाणं लावून आहेत, पण शिंदेसाहेबांनी निधीच्या स्वरुपात खोके दिले. आमची कधी ‘त्यांच्यासारखी’ वाताहत झाली नाही. रोज कितीतरी कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांना सोडून जात आहेत. पण आमच्याकडे आलेला कुणी परत त्यांच्याकडे गेला आहे का? कारण शिंदेसाहेबांवर लोकांचा विश्वास आहे, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांना लक्ष्य केले.

आधीचे मुख्यमंत्री गाडी चालवत पंढरपूरला पोहोचायचे

शिंदेसाहेब दिवसरात्र तळागाळातल्या लोकांजवळ पोहोचून त्यांच्यासाठी काम करत आहेत. पण ते एक दिवस हेलिकॉप्टरने गावी गेले तर त्याच्या लगेच बातम्या करण्यात आल्या. ते मुख्यमंत्री आहेत म्हणून वेळ वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरने गेले, कारण मुख्यमंत्र्यासाठी एकेक क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो, त्यामुळे ते गाडी चालवत थोडीच जाणार? आधीच्या मुख्यमंत्र्यांकडे खूप वेळ होता, ते गाडी चालवत चालवत पंढरपूरला पोहोचायचे, असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

ही युती वेगळ्या विचारांची

विरोधकांकडून शिवसेनेच्या जाहिरात वादामुळे होणार्‍या टीकांवर श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. खालच्या स्तरावर होणाऱ्या गोष्टींमुळे एवढ्या मोठ्या युतीवर (BJP Shivsena alliance) परिणाम होत नाही. ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. एका विचाराने, एका उद्देशाने तयार झालेल्या युतीत इतक्या किरकोळ कारणाने वितुष्ट येणार नाही. या युतीत माझं काय, तुमचं काय या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या जनतेला काय हवंय, महाराष्ट्राचं हित कशात आहे, हे समोर ठेवलं जातं.