अंधेरी पोटनिवडणूक चुरशीची होणार!भाजप, ठाकरे गटाच्या प्रचाराला रंग चढणार

मुंबई,१​४​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-  अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी, तर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी शुक्रवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केले. शिवसेनेतील बंडखोरी, त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. दोन्ही गटांचे उमेदवार ठरल्याने पहिला अंक आता संपला आहे. आता दोन्ही बाजूंकडून प्रचाराला खरा रंग चढणार आहे. दोन्ही बाजूचे नेते हिरिरीने प्रचारात उतरणार आहेत.

अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आज महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. अंधेरीची पोटनिवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आणि शिंदे गट- भाजपसाठी लिटमस टेस्ट आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असून मतदार कोणाला कौल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीत मुरजी पटेल यांच्यासोबत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय (आठवले गट)चे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, खासदार मनोज कोटक, भाजप नेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, अमित साटम, मुंबई भाजप उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी सहभागी झाले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते.

मविआ, सत्ताधाऱ्यांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची

ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांसाठी तसेच भाजपसाठी ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे. ठाकरे गटाला सहानुभूती मिळण्याची आशा आहे, तरी भाजप तसेच बाळासाहेबांची शिवसेना या दोघांनीही निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवली आहे. या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद राज्याच्या राजकारणात तर उमटणार आहेतच; पण त्यानंतर लगेचच मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठीही हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मशाल हे चिन्ह सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आहे आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आहे. त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार स्वीकारले आहेत. त्यामुळे उद्धव सेनेला मत म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला मत देणे आहे. अशा स्थितीत युतीचा पारंपरिक मतदार उद्धव सेनेला मतदान करणार नाही. या निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडून येतील.

रमेश लटके हयात असते तर ते शिंदेंबरोबर असते : नारायण राणे

 आज जर रमेश लटके हयात असते तर ते नक्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असते, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकच नव्हे तर येणारी मुंबई महापालिका निवडणूकही भारतीय जनता पार्टी जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतली एकही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला जिंकता येणार नाही. दक्षिण मुंबईची जागासुद्धा भाजपाच जिंकेल, असे ते म्हणाले.

आज अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे गटाकडून करण्यात आलेले शक्ती प्रदर्शन, हे शक्तिप्रदर्शन नसून, एक ना धड भाराभर चिंध्या… याचेच प्रदर्शन होते. जे कमजोर असतात तेच एकमेकांना उब देऊन आपण शक्तिशाली असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतात. सगळे एकत्र आले म्हणजे शक्ती आली, असे होत नाही असेही राणे म्हणाले. उद्धव ठाकरे आता बोलतात की हिम्मत असेल तर समोर येऊन लढा. आधी तेच म्हणत होते की आमचे सरकार पाडून दाखवा. आता पाडून दाखवले… आता निवडणुकीत पण पाडून दाखवू. मातोश्रीत बसून नुसत्या वल्गना करणे सोपे आहे. अहो जरा मातोश्रीचा दरवाजा तरी उघडा… बाहेर बघा… वारा सुटला आहे की पाऊस पडतोय ते… महाराष्ट्रावरचे बोलणे संपले. आता बोलण्यातून मुंबईपण गेली. आता यांच्या तोंडात वरळी आहे. तेही जाईल असे भाकितही त्यांनी केले. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणे यांचीही सभा होईल, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावेळी जाहीर केले.

बनावट शपथपत्राची चौकशी सुरु

बनावट शपथपत्राची चौकशी सुरु आहे. दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. लवकरच वास्तव समोर येईल, असे नारायण राणे म्हणाले. सकाळी बाबुलनाथचे दर्शन घेऊन मी प्रचाराला सुरूवात केली आहे. मी एकच सांगतो की, दक्षिण गोवा आणि दक्षिण मुंबई माझ्याकडे आहे. मी तिकडेही जाऊन आलो आणि इकडे मुंबईतही प्रचार सुरु आहे. मी दोन्ही मतदार संघ निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.