सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दहावी-बारावीचे निकाल लांबणीवर

मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी संप पुकारले असून याचा थेट फटका शिक्षण विभागाला बसला आहे. राज्यातील अनेक शाळा – महाविद्यालये शिक्षक नसल्यामुळे बंद आहेत तर या संपामुळे दहावी – बारावीच्या परीक्षेची पेपर तपासणी रखडली असून ५० लाख पेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे यंदा दहावी-बारावीचा निकाल उशीराने लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने या संपावर लवकर तोडगा काढला नाही तर निकाल रखडणार असल्याचे चित्र आहे.

काही दिवसाआधी कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारले होते. ही घटना शांत होत असतांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यव्यापी संप पुकारले आहे. या संपात सरकारी-निमसरकारी कर्मचारीसह शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या शिक्षकांचे राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी सहकार्य असले, तरी संपाच्या पार्श्वभूमीवर बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दहावी बारावीचे निकाल आठवडाभर पुढे जाण्याची शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनीही बेमुदत संपाची हाक दिलेली आहे. या काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला असून बारावीच्या परीक्षा संपत आल्या आहेत. तर, दहावीचे आणखी ३ पेपर बाकी आहेत. त्यामुळे आता राज्य शासन यासंदर्भात पुढे काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.