मविआ १७ डिसेंबरच्या महाराष्ट्र द्रोही विरोधात हल्लाबोल मोर्चावर ठाम: सहभागी होण्याचे राज्यातील जनतेला आवाहन

‘फेक अकाऊंटवरून पोस्ट, मग १५-२० दिवस काय…’; अमित शहांच्या भेटीवर काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई ,१५ डिसेंबर / प्रतिनिधी :-महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, तसंच महागाई, बेरोजगारी आणि सीमावादाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीतर्फे 17 डिसेंबरला मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या निमित्ताने आज ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याप्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. 

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे दोन्हीही मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यामध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर अनेक निर्णय घेतले आहेत. यावर आता महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “कालच्या बैठकीत नवीन काय झालं? सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. न्यायालयामध्ये प्रकरण असताना कोणी काही करु नये. तरीही बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला गेला. फक्त महाराष्ट्रानेच हे सर्व नियम का पाळायचे? मुळातच या बैठकीचा अर्थ काय होता? कर्नाटककडून नेहमीच प्रश्न चिघळवला गेला आहे.”

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नावाने महाराष्ट्रसंबंधी वादग्रस्त ट्वीट करण्यात आले होते. अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, यावर ते ट्विटरचे अकाउंट आपलं नव्हत, अशी माहिती मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “गेली १५ ते २० दिवस हा सीमावादाचा प्रश चिघळत चालला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे ट्विटर हॅक झाले का? कसे झाले? तो शुद्ध होईलच. पण, इतकेदिवस तुम्ही का गप्प बसला होतात? याबाबतीत खुलासा दिल्लीत बैठक होईपर्यंत का थांबला होता? हे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखेच झाले. त्यात आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होयबा करून आले.” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले अजित पवार

‘महाराष्ट्राद्रोही विरोधात हल्लाबोल’ या महामोर्चाच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या प्रमुख नेत्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्र राज्य सरकारचा मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेला भोंगळ कारभार, छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांविषयी सत्ताधाऱ्यांकडून होणारी बेताल वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, महागाई, बेरोजगारी अशा विविध समस्यांविषयी हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही त्यामुळे राज्यातून ज्या लोकांना या मोर्चात सहभागी व्हायच आहे त्यांनी निश्चितपणे सामील व्हावे, असे आवाहन अजितदादांनी राज्यातील तमाम जनतेला केले.

मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने निघेल यात कोणतीही विध्वंसक घटना घडणार नाही, लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना ज्याप्रमाणे मोर्चा निघतो त्याप्रकारचे स्वरूप या मोर्चाचे असेल. राज्य सरकारकडे या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आली आहे अद्याप परवानगी मिळालेली नसली तरी ती मिळेल, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप, कॉंग्रेसचे नेते नसीम खान, शिवसेना आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेना आमदार सचिन अहिर, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रईस शेख, माकपचे प्रकाश रेड्डी, सीपीआयचे मिलिंद रानडे, शेकापचे राजू कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.