जागतिक पातळीवर विकासाचा वेग मंदावला : भारतावरही परिणाम होईल-अर्थतज्ज्ञ रघुराम राजन

सवाई माधोपुर : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी इशारा दिला की, येणारे वर्ष भारतासाठी नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अधिक आव्हानात्मक असेल. ते म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासासाठी अनेक सुधारणा कराव्या लागतील. शिवाय निम्न मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करून काही धोरणे आखणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन बुधवारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्याशी चर्चा करताना त्यांनी देशासमोरील आर्थिक आव्हानांवर चर्चा केली. रघुराम राजन म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसला. हा वर्ग लक्षात घेऊन धोरण आखणे आवश्यक आहे.

लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सक्षम वातावरण निर्माण करण्याची गरज सांगून त्यांनी हरित ऊर्जेच्या वापरावर भर दिला. वाढत्या आर्थिक विषमतेच्या आव्हानांवर भाष्य करताना रघुराम राजन म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात घरून काम केल्यामुळे उच्च मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढले. मात्र कारखान्यांतील कामगारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे महामंदीच्या काळात आर्थिक विषमता वाढल्याचे दिसून आले. रघुराम राजन म्हणाले की, श्रीमंतांना कोणतीही आर्थिक समस्या जाणवत नाही. गरीब वर्गाला रेशन व इतर गोष्टींची मदत मिळाली. मात्र, निम्न मध्यमवर्गीयांना याचा मोठा फटका बसला. नोकऱ्यांअभावी बेरोजगारी वाढली आहे, असे सांगून त्यांनी या निम्न मध्यमवर्गासाठी सरकारने धोरण आखावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना राजन म्हणाले की, देशात पुढील क्रांती सेवा क्षेत्रात होऊ शकते. देशात नवीन प्रकारची हरितक्रांती घडत असून हवामान बदलाचे आव्हान लक्षात घेऊन भारत पवनचक्क्या आणि पर्यावरणपूरक इमारती उभारण्यात पुढाकार घेऊ शकतो, असेही ते म्हणाले.

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन सहभागी झाले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये सुरु आहे. सवाई माधोपुर येथील भदौती येथे रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले. यात्रेतील त्यांच्या सहभागानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.

रघुराम राजन हे राहुल गांधी यांच्याबरोबर यात्रेत सहभागी झाल्याचा फोटो काँग्रेसने सोशल मीडीयावर व्हायरल केला आहे. द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी लोकांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या आपण यशस्वी होऊ हे दर्शवत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसची ही पदयात्रा आज राजस्थानमधील बिलोना कलान मुक्कामी असणार आहे.

काही दिवसांपूर्वीच रघुराम राजन यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली होती. सध्या अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नाही, परंतू तरीही सरकार सत्य स्वीकारण्यास तयार नाही आणि या प्रश्नाचे गांभीर्य सातत्याने कमी करत असल्याचे राजन म्हणाले होते. इतकेच नव्हे तर आर्थिक मंदीच्या समस्येवर मात करण्यासाठी मोदी सरकारला ही समस्या मान्य करावी लागेल कारण ती लपवून ठेवल्याने परिस्थिती सुधारणार नाही, असेही ते म्हणाले होते. देशात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रघुराम राजन यांनी सावधगिरीचा इशाराही दिला होता.