‘एसटी’प्रवास महागला; भाडेवाढ जाहीर!

मुंबई : दिवाळीच्या कालावधीत एसटी महामंडळाने भाडेवाढ जाहीर केली आहे, त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्यांच्या खिशावर भार वाढणार आहे. एसटी महामंडळाने २० ऑक्टोबरपासून पाच रुपयांपासून ते ७५ रुपयांपर्यंतची दरवाढ केली आहे.

ही दरवाढ आज जाहीर करण्यात आली असून मागच्या काही दिवसात एसटीचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता हा हंगामी निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. २० ऑक्टोबर रात्री १२ वाजल्यापासून ही भाडेवाढ राज्यभर लागू होणार आहे.

यामुळे दादर-स्वारगेट मार्गावर सध्या २२५ रुपये दर आहे तो या काळात २६० रुपये असणार आहे. तर शिवशाही गाडीसाठी ३५० असलेल्या दरात ३८५ रुपये इतकी वाढ केली जाणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

भाडेवाढ करताना शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांना ही भाडेवाढ करताना त्यामुन वगळण्यात आले आहे. या गाड्या सोडून बाकीच्या साधी गाडी, निम आराम गाडी आणि शिवशाही या गाड्यांना ही भाडेवाढ लागू असणार आहे. तसेच दिवाळीसाठी एसटीच्या १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत या गाड्या धावणार आहेत.