ग्रॅंटरोड येथील महारोजगार मेळाव्यात ५ हजार ५८३ पदांसाठी झाल्या मुलाखती

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन; नोकरी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई,८  एप्रिल / प्रतिनिधी :-  कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ग्रॅंटरोड येथे झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी त्यांच्याकडील ५ हजार ५८३ पदांसाठी नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्यात नोकरी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मेळाव्यात २६ उद्योग तथा कंपन्यांनी सहभाग घेतला. आज सकाळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.

गावदेवी, ग्रॅंटरोड (पश्चिम) येथील शारदा मंदिर हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमास मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

५ लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे ही त्यांनी सांगितले.

मेळाव्यात विविध २६ कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पहिल्या फेरीत साधारण २२२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.  त्याचबरोबर मेळाव्यात विविध शासकीय मंडळेही सहभागी झाली. त्यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या त्यांच्याकडील विविध कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली.