वैजापूर तालुक्यातून ४४​ भाविक हज यात्रेला रवाना

वैजापूर ,१४ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातून ४४​ भाविक पवित्र हज यात्रेला रवाना झाले आहेत. हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांमध्ये वैजापूर शहरातील २० जण, खंडाळा येथील २२ जण तर सुराळा येथील २ जणांचा समावेश आहे. हज यात्रेसाठी जाणाऱ्या या सर्व भाविकांना नातेवाईक व मित्र परिवारतर्फे निरोप देऊन यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून ४४ पैकी ३९ जण छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवरून तर  ५ जण मुंबई एअरपोर्टवरून विमानाने हज यात्रेसाठी रवाना होणार आहेत. 

हज यात्रेसाठी वैजापूर तालुक्यातून एकूण ६१ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ४४ जण हज यात्रेला रवाना झाले आहेत तर दोन जण मेडिकल प्रॉब्लेममुळे तर सहा जण आर्थिक प्रॉब्लेममुळे हज यात्रेसाठी जाऊ शकले नाहीत.नऊ जण प्रतीक्षा यादीत आहेत. हज यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना प्रशिक्षण व माहिती देण्यात आली. अशी माहिती हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना गेल्या अनेक वर्षांपासून मदत व सहकार्य करणारे नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता वाय.के.पठाण (हाजी युसूफ भाई) यांनी दिली.

शहर व ग्रामीण भागातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या  भाविकांना माजी नगराध्यक्ष साबेर खान, माजी उपनगराध्यक्ष हाजी अकिल सेठ, सेवानिवृत्त अभियंता वाय.के.पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष मलिक काझी, रहीम खान,  ताहेर खान (सुलतान), आमिर अली, अँड.राफे हसन आदींनी निरोप दिला.

भाविकांना मदत करणारे सेवानिवृत्त उपअभियंता हाजी युसूफ पठाण

तालुक्यातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना अर्ज भरण्यापासून ते हज यात्रेसाठी रवाना होण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेसाठी नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता वाय.के.पठाण (हाजी युसूफ भाई) हे गेल्या अनेक वर्षांपासून मदत व सहकार्य करतात. यावर्षी तालुक्यातून ४४ जण पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले असून त्यांना हज यात्रेसंदर्भात प्रशिक्षण व माहिती देण्यात आल्याचे हाजी युसूफ पठाण यांनी सांगितले.