वैजापूर शहरातील लसीकरण केंद्राची उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्याकडून पाहणी

वैजापूर ,१ डिसेंबर /प्रतिनिधी :-वैजापूर शहरात नगरपालिकेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जवळपास 40 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला असून शंभर टक्के लसीकरणासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहे. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी  नगरपालिकेच्या भगवान महावीर रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पालिकेतर्फे शहरात ‘हर घर दस्तक’ ही मोहीम राबविण्यात येत असून ठिकठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी आज नगरपालिकेच्या भगवान महावीर रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली व शहरात लसीकरणाचा वेग पाहून समाधान व्यक्त केले. नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेर खान,नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता निकाळे, स्वछतादूत ठाकूर धोंडीराम सिंह राजपूत यावेळी उपस्थित होते.पालिका पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्या आवाहनाला शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मुस्लिमबहुल भागात लसीकरण केंद्रावर रांगा दिसत आहेत. शहरात 18 वर्षावरील नागरिकांची संख्या 38 हजार 691 असून आतापर्यंत जवळपास 35 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. पालिकेच्यावतीने शहरात घरोघरी जाऊन लस न घेणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण के जात असून येत्या एक- दोन तीन दिवसांत शहरात शंभर टक्के लसीकरण पूर्ण होईल असे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी यावेळी सांगितले.