भाजप -शिवसेनेत मिठाचा खडा 

मी, फडणवीस जनतेच्या मनातमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

युतीत खडा पडेल असं कुणीही काहीही बोलू नये-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, १३ जून / प्रतिनिधी :- आज वर्तमान पत्रात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पसंती असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सध्या या चाहिरातीची सर्वत्र चर्चा सुरु असून भाजप- सेनेत सर्व सुरळीत सुरु नसल्याची चर्चा सुरु आहे. तसेच याविषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक होती. या बैठकीनंतर ते बाहेर आले , त्यांनी माध्यम प्रतिनिधींना हात जोडले आणि ते निघून गेले. या विषयावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याने याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आज राज्यातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्रात देशामध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे सरकार या आशयाची जाहिरात छापून आली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री पदासाठी सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचे म्हटले आहे. यावरुन आता भाजपमध्ये नाराजी असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

मागील काही दिवसांपासून सेना- भाजपमध्ये अंतर्गत कुरबोरी सुरु असल्याचे सांगितले जात आहे. यात कल्याण डोबिवली लोकसभा मतदार संघावरील वाद, सेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू देण्याचा विषय असो किंवा अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात येणारे आरोप असोत, यावरुन दोन्ही पक्षात वाद सुरु आहेत. यात शिवसेनेने केलेल्या जाहिरातीवरुन सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेच्या मंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा केली. या बैठकीत आज छापून आलेल्या जाहिरातीबद्दल तसेच सेना- भाजपमध्ये सुरु असलेल्या वादावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांना कानमंत्र दिला आहे. यावेळी त्यांनी कोणीही चिंता करायची गरज नाही, या गोष्टी होतच राहणार. सर्वांनी काळजी घेतली पाहिजे., आपण एकत्रच आहोत. कानावर पडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. माध्यमांसमोर असे कोणतेही वक्तव्य करु नका ज्यामुळे युतीत खडा पडेल, असा सल्ला फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला आहे. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या शिवसेनेच्या जाहिरातीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने युतीत काहीतरी कुरबोरी सुरु असल्याचे बोलले जात आहे.

फडणवीसांना शिंदेंचे आव्हान

सर्व्हेक्षणातील सर्वात ठळक बाब म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचे सर्वेक्षण. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. यासंदर्भात शिंदेसेनेने दिलेल्या जाहीरात केवळ शिंदे व मोदी यांचाच फोटो आहे. मात्र या जाहिरातीत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो गायब आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदेच लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख जाहिरातीत करण्यात आला आहे. वर ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, असा दावाही केला आहे. जाहिरातीत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.

सर्व्हेत दावा काय?

एका सर्व्हेनुसार मुख्यमंत्री शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंदी देण्यात आली. तर त्याच्या खालोखाल देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले. शिंदेंना महाराष्ट्रात 26.1 तर फडणवीस – 23.2 यांना पसंती देण्यात आली.

मी, फडणवीस जनतेच्या मनात

मी आणि देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनात आहे, हे जास्त महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल आहे. शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या जाहिरातीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातीलच नाही तर जगातले नंबर वन पंतप्रधान असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. कोल्हापूर दौऱ्याआधी ते माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये देशात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात शिंदे हे जनतेच्या पसंतीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जाहिरातीवर भाजपच्या नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. सर्वच बाजूने टीकेची झोड उठल्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

विजय टिकवणं ही आमची जबाबदारी : उदय सामंत

देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी गेल्या ११ महिन्यांत सांघिकपणे महाराष्ट्रात जे काम केलं त्याची महाराष्ट्राने नोंद घेतली आहे. सर्वेक्षण झालं याचा अर्थ आमची जबाबदारी वाढली आहे, विजय टिकवणं ही आमची जबाबदारी आहे, असं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं.