आळंदीत वारीला गालबोट? मंदिर प्रवेशावरुन पोलिस वारकऱ्यांमध्ये वाद, पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज

पुणे,​११ जून ​/ प्रतिनिधी :- आज आळंदी येथून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली असून वारकऱ्यांच्या हरिनामाच्या नामघोषानं दुमदुमली आहे. मात्र या सोहळ्याला गालबोट लागल्याचं समोर आलं आहे. पोलिस आणि वारकरी यांच्यात मंदिर प्रवेशावरुन वाद झाल्यानं पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे.

आज माऊलींची पालखी विठूरायाला भेटण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. यासाठी हजारो वारकरी हे अलंकापूरीत इंद्रायणीकाठी जमले आहेत. पालखी प्रस्ताना दरम्यान मानाच्या पालख्यांना फक्त प्रवेश दिला जातो. ज्या दिंड्या मानाच्या असतात, त्या मंदिराच्या जवळ असतात. मात्र, ऐनवेळी या दिंडीतील मोजक्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश देण्यात आल्यानं इतर वारकरी नाराज झाले. नाराज झालेले वारकरी मंदिरात जाण्यासाठी गर्दी करत होते. यावेळी पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला.

आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच आळंदी येथून प्रस्तान होणार आहे. यासाठी हजारोच्या संख्येनं वारकरी आळंदीला इंद्रायणीच्या काठी जमले आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र, वारकरी आणि पोलीस यांच्यात मंदिर प्रवेशावरुन वाद झाल्यानं वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांकडूनच वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. वारकऱ्यांवर केलेल्या लाठीचार्जमुळे वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उमटली आहे.

पालखी सोहळ्यासाठी ४७ दिंड्यांना मंदिरात प्रवेश आहे. प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांना त्यात प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश दिला जातो. मात्र काही वारकरी मंदिर प्रवेश करण्यासाठी आग्रही होते. यामध्ये पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर हे वारकरी पोलीस बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांना आणि बॅरिकेट्सना लोटून देत मंदिर प्रवेशासाठी पुढे सरकले मात्र पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला आणि यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला.

हा वाद मिटल्यानंतर माऊलींच्या मंदिरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि वारीला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. यानंतर वारकरी आणि पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

लाठीचार्ज झालेला नाही, न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका!

नागपूर : आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचे प्रथम प्राध्यान्य होते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे सांगितले.

आळंदी येथील घटनेसंदर्भात ते माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त ढगे पाटील आणि सर्व मानाच्या दिंडीचे प्रमुख यांची एक बैठक झाली आणि गेल्यावर्षीसारखी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक मानाच्या दिंडीला ७५ पासेस देण्यात याव्यात, असा सर्वानुमते निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

त्यानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आले. मात्र काही स्थानिक तरुणांनी मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडी झटापट झाली. आता परिस्थिती संपूर्णपणे शांत असून पोलिस स्थानिकांशी चर्चा करीत आहेत. आम्ही सुद्धा गांभीर्याने याची दखल घेतली आहे. काही माध्यमांनी याचे वृत्तांकन करताना फार मोठा लाठीमार अशा बातम्या दिल्या, माझी माध्यमांना विनंती आहे की जे झाले नाही, त्यातून जनतेत क्षोभ निर्माण होईल, असे काही करू नका.

माझे राजकीय पक्षांना सुद्धा आवाहन आहे की, त्यांनी वस्तुस्थिती समजावून घ्यावी. वारकऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. अशाही स्थितीत त्यांना राजकारण करायचे असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी लागेल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्यानं सुप्रिया सुळे संतापल्या

राष्ट्रवादी काँग्रेच्या कार्यध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध असो! या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यायी मागणी सुळे यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, वारीची शेकडो वर्षाची परंपरा आहे. आजवर जे कधीही घडलं नाही ते यंदा घडलं. वारकऱ्यांवर बळाचा वापर करण्याची घटना यापुर्वी कधीही घडली नव्हती. वारकऱ्यांनी आपल्या साध्या सोप्या शिकवणुकीतून देशाला दिली दाखवली आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळं माऊलींच्या दिंडी सोहळ्याला गालबोट लागलं. वारकऱ्यांवर केलेला लाठी हल्ला हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी दोशी असलेल्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

पोलिसांकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. वारकऱ्यांवर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नसून झटापट झाल्याचं पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितलं आहे. मागच्यावर्षी या ठिकाणी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी काही महिला जखमी सुद्धा झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळ बैठका घेतल्या होत्या. यात गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक मानाच्या पालखीतील 75 जणांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला होता. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.