पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकात कारगिल विजय दिवस सोहळा

पुणे, 26 जुलै 2020

जगातील सर्वात प्रतिकूल प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाखच्या कारगिल-द्रास क्षेत्रातील शौर्य आणि पराक्रमाची गाथा म्हणून दर वर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या दिवशी भारतीय सशस्त्र सैन्याने अत्यंत प्रतिकूल भूमीवर  खराब हवामानात बर्फाच्छादित शिखरांच्या तीव्र उतारावर चिकाटी आणि शौर्याने शत्रूचे मनसुबे नापाक केले. सुमारे 16,000 फूट उंचीवर लढल्या गेलेल्या या कारगिल युद्धात अर्थात ऑपरेशन विजय मध्ये 1,042 पाकिस्तानी सैन्य मारले गेले तर 527 भारतीय सैनिक शहीद झाले होते.

भारतीय सैन्य दलाच्या विजयाच्या स्मरणार्थ आणि आपल्या हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानास आदरांजली म्हणून 21 व्या कारगिल विजय दिवशी पुणे येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकात  पुष्पचक्र अर्पण समारंभ आयोजित करण्यात आला होता. शहीद जवानांना सन्मानित करण्यासाठी दक्षिणी कमांडच्या सर्व विभागांच्या वतीने लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले.

दक्षिण कमांड मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ, लेफ्टनंट जनरल डी एस आहुजा आणि मेजर जनरल ए.के. हुक्कू (सेवानिवृत्त) यांनीही पुष्पचक्र अर्पण केले. कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन दक्षिण कमांड मुख्यालयाचे  निवडक अधिकारी आणि जवान तसेच कारगिल युद्धातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *