खाप महापंचायतीचे शिष्ठमंडळ कुस्तीपटूंच्या न्यायासाठी राष्ट्रपतींना भेटणार

अखेर क्रिकेटपटूंचा कुस्तीपटूंना पाठिंबा

नवी दिल्ली,​१ ​जून / प्रतिनिधी:- जवळपास गेला महिनाभर जंतर-मंतर येथे कुस्तीपटूंनी आंदोलन छेडलेले असताना आता त्यांना देशातील काही माजी क्रिकेटपटूंचाही पाठिंबा लाभत आहे. इरफान पठाण, अनिल कुंबळे, रॉबिन उथप्पा, मनोज तिवारी यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ भाष्य केले आहे. तर दुसरीकडे कुस्तीपटू आपापल्या घरी परतल्याने खाप महापंचायतीचे शिष्ठमंडळ कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी आता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेणार आहेत.

भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह काही कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारले. दिवसेंदिवस हे आंदोलन वेगळे रूप धारण करत गेले. यादरम्यान, कुस्तीपटूंनी क्रिकेटपटूंना त्यांना पाठिंबा दर्शवण्याचे आवाहन केले. कपिलदेव यांनी याविषयी मागे मत व्यक्त केले होते. परंतु असंख्य माजी क्रिकेटपटू तरीही शांत होते.

कुंबळेने २८ मे रोजी कुस्तीपटूंवर ओढवलेल्या प्रसंगाचा विरोध करताना याविषयी लवकर योग्य तो निर्णय घेण्याची केंद्र शासनाला विनंती केली. त्यानंतर उथप्पानेसुद्धा हे प्रकरण शांतपणे हाताळून यावर लवकर काय तो तोडगा काढावा, असे ट्वीट केले. मनोज तिवारीने संपूर्ण देश कुस्तीपटूंसह आहे, असे लिहितानाच शासनाला टोलाही लगावला. दरम्यान, सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंपैकी मात्र कोणीही अद्याप यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

२८ मे रोजी कुस्तीपटूंसोबत जे घडले, त्याची छायाचित्रे पाहून फार दुख: झाले. संवाद साधल्याने कोणतेही प्रकरण सोडवता येते. याकडे केंद्र शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

– अनिल कुंबळे

भारतासाठी कुस्तीत नाव कमावणाऱ्यांवर अशी वेळ येणे, हे फारच क्लेशदायक आहे. हे प्रकरण लवकरच शांतपणे मिटवण्यात यावे, यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

– रॉबिन उथप्पा

कुस्तीपटू आणि भारताचा तिरंगा जमिनीवर पडलेला पाहणे फार दुखावणारे आहे. कृपया हे प्रकरण अधिक वाढू देऊ नका.

– इरफान पठाण

कदाचित यालाच आझादी का अमृत महोत्सव असे म्हणतात तर. लज्जास्पद असे दृश्य. अवघा देश कुस्तीपटूंच्या पाठिशी आहे.

– मनोज तिवारी

साक्षीकडून चेन्नईचे अभिनंदन व शासनाला टोला

आयपीएलचे जेतेपद मिळवणाऱ्या चेन्नईचे कुस्तीपटू साक्षीने अभिनंदन करतानाच शासनाला टोलाही लगावला. “धोनी आणि चेन्नईचे जेतेपदासाठी अभिनंदन. किमान तुम्हाला शासनाकडून तितका आदर मिळत आहे. आमचा लढा मात्र न्याय मिळेपर्यंत सुरूच असेल,” असे ट्वीट साक्षीने केले.