मोदी सरकारची ९ वर्षे सेवा ,सुशासन व गरीब कल्याणाची-केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

मुंबई :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  नेतृत्वाखालील सरकारचा  ९ वर्षांतील कारभार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा आहे. विकासाला गती देणाऱ्या कार्यक्रमांची धडाक्याने अंमलबजावणी केल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली असून मोदी सरकारच्या कारभारामुळे भारताची जागतिक पातळीवर प्रतिष्ठा उंचावली आहे , असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. अभियानाचे संयोजक आ. प्रवीण दरेकर, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा , खा. संजय भाटिया, आ. प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते.

श्री. ठाकूर म्हणाले की, कॉंग्रेसच्या १० वर्षाच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सरकारचा अनुभव जनतेने घेतला. मोदी सरकारने मागच्या ९ वर्षात प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत  भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा आदर्श ठेवला. मोदी सरकारने विविध क्षेत्रात लोकांच्या अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी केली आहे. एकेकाळी भ्रष्टाचाराने पोखरल्यामुळे भारत म्हणजे एक दुर्बळ अर्थव्यवस्था होती, मात्र पारदर्शक कारभारामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेने जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्यापर्यंत मजल मारली आहे. मोदी सरकारने याच काळात सीरिया ,येमेन ,युक्रेन आदी देशात अडकलेल्या १९ हजारांहून भारतीयांना मायदेशी सुखरूप परत आणले गेले.

 ‘डिजिटल इंडीया’ ची खिल्ली उडवणा-या कॉंग्रेसला चपराक लगावत आज ४८ कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली. या खात्यांमध्ये २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. पूर्वी देशात वारंवार दहशतवादी हल्ले होत असत. मोदी सरकारने दहशतवादी शक्तींना सर्जिकल स्ट्राइक,एअर स्ट्राईक चे उत्तर दिल्याने देश दहशतवादापासून मुक्त बनला आहे. याचबरोबर महाकाल मंदिर कॉरिडॉर, अयोध्येतील राम मंदिर उभारणी ,केदारनाथ धाम पुनर्विकास ,काशी विश्वनाथ धाम चा कायापालट करणारी  विकास कार्ये करत भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि जतन केले जात आहे. पंतप्रधान मोदी जनतेच्या सेवेत प्रधान सेवक म्हणून अहर्निश कार्यरत असून देश विकासाची नवी शिखरे पादाक्रांत करेल असा विश्वास श्री. ठाकूर यांनी व्यक्त केला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात ३१ मे पासून  महिनाभर महा जनसंपर्क अभियानास प्रारंभ झाला आहे. अभियाना अंतर्गत मागच्या ९ वर्षात मोदी सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजना व विकास कामांची माहिती देशातील ८० कोटी नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.