माजी क्रीडा उपसंचालक महादवाड यांच्यासह चार आरोपीच्या कोठडीत वाढ 

बनावट कागदपत्राआधारे शासकीय नोकरी मिळविलेल्या उमेदवारांविरुध्द गुन्ह्यात अटक

औरंगाबाद / प्रतिनिधी
बनावट कागदपत्राआधारे शासकीय नोकरी मिळविलेल्या उमेदवारांविरुध्द तसेच कागदपत्रे हस्तगत केलेल्या 188 जणांविरुध्द दाखल गुन्ह्यात अटक चौघां आरोपींच्या कोठडीत रविवारपर्यंत दि.28 वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी शनिवारी दि.27 दिले.

 क्रिडा अधिकारी भाऊराव रामदास वीर (52, रा. ताजनगर, शेवगाव जि. अहमदनगर), अंकुश राठोड (35, रा. पारेगाव, मानेगाव ता.जि. जालना), सेवानिवृत्‍त अधिकारी राजकुमार दत्‍तात्रय महादावाड (59) आणि गेवराई विभागतील दप्‍त कारकून शंकर शामराव पतंगे अशी आरोपींची नावे आहेत.
महाराष्ट्र अँम्युचुअर असोसिएशनच्या वतीने सन 1988 ते 2005 या काळात 19 वर्षे वयोगटाखालील उमेदवारांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या नव्हत्या. तर सन 1997 ते 2005 या काळात ट्रॅम्पोलिन व टंबलिग क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रिडा स्पर्धेच्या बनावट प्रमाणपत्राआधारे पाच टक्के आरक्षण मिळविण्यासाठी उमेदवार खेळाडूंनी सन 2016 ते 2019 या काळात ट्रॅम्पोलिन व टंबलिग या क्रिडा स्पर्धेतील सहभागाचे अर्हता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी प्रस्तावासोबतच मुळ निकालात फेरफार केला. तसेच ट्रॅम्पोलिन संघटनेचे सचिव राजेंद्र पठाणीया यांच्या खोट्या व बोगस सह्या असलेले प्रतिज्ञापत्र, बनावट प्रवेश अर्ज व फॉर्म प्रस्तावासोबत सादर केले. या कागदपत्राआधारे उमेदवार खेळाडूंनी पाच टक्के आरक्षण अंतर्गत अर्हता प्रमाणपत्र प्राप्त केले. या बनावट कागदपत्राआधारे अर्हता प्रमाणपत्रांचा विविध शासकीय कार्यालयात नोकरीसाठी उपयोग करण्यात आला. तसेच बनावट कागदपत्रांआधारे काही उमेदवारांनी शासकीय कार्यालयात नोकरी मिळवून उर्वरीत उमेदवारांनी बनावट कागदपत्रे सादर करुन शासनाची दिशाभूल केली. त्याप्रकरणी विभागीय उपसंचालक उर्मिला गणपतराव मोराळे यांच्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिस ठाण्यात 188 उमेदवार खेळाडूंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील दोघा आरोपींच्या कोठडीची मुदत संपल्याने आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांच्या  कोठडीत रविवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले. प्रकरणात सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी काम पाहिले.