आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत झेन खान व ऑलिव्हर क्रॉफर्ड यांच्यात विजेतेपदासाठी लढत

एकेरीत भारताच्या मनीष सुरेशकुमारचे आव्हान संपुष्टात

पुणे, 27 मार्च 2021:  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित 15000डॉलर केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्ड व झेन खान यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम प्रवेश केला. तर, भारताच्या मनीष  सुरेशकुमारला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.  

Displaying Zane Khan of USA..jpg
Zane Khan of USA

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या झेन खान याने आपली विजयी मालिका कायम ठेवत स्वीडनच्या पाचव्या मानांकित जोनाथन म्रीधाचा 6-1, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 2तास 13मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये झेनने सुरेख खेळ करत वर्चस्व राखले. या सेटमध्ये झेनने जोनाथनची दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-1 असा जिंकून आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या जोनाथनने दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला जोरदार खेळ करत दुसऱ्या गेममध्ये झेनची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत 3-0 अशी आघाडी घेतली. पण ही आघाडी जोनाथनला फार काळ टिकविता आली नाही. झेनने पाचव्या व नवव्या गेममध्ये जोनाथनची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 5-5 अशी बरोबरी साधली. झेनने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवत पुढच्याच गेममध्ये जोनाथनची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5 असा जिंकून अंतिम फेरी गाठली.

Displaying Oliver CRAWFORD of USA.jpg
Zane Khan of USA

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अमेरिकेच्या चौथ्या मानांकित ऑलिव्हर क्रॉफर्ड याने भारताच्या सहाव्या मानांकित मनीष सुरेशकुमारचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 24 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये पहिल्या गेममध्ये ऑलिव्हरने मनीषची, तर दुसऱ्या गेममध्ये मनीषने ऑलिव्हरची सर्व्हिस रोखली. त्यांनंतर पुढच्याच गेमला ऑलिव्हरने आपला रंगतदार खेळ सुरू ठेवत मनीषची पून्हा सर्व्हिस रोखली व सामन्यात 3-1अशी आघाडी घेतली. ऑलिव्हरच्या बिनतोड सर्व्हिससमोर मनीषची खेळी निष्प्रभ ठरली व हा सेट ऑलिव्हरने 6-4 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील मनीषला सूर गवसला नाही व याचाच फायदा घेत ऑलिव्हरने तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 असा सहज जिंकून विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य(मुख्य ड्रॉ)फेरी: एकेरी: पुरुष:
झेन खान(अमेरिका)[8] वि.वि.जोनाथन म्रीधा(स्वीडन)[5] 6-1, 7-5;
ऑलिव्हर क्रॉफर्ड(अमेरिका)[4] वि.वि.मनीष सुरेशकुमार(भारत)[6] 6-4, 6-2;