किर्तीकर यांचे गैरसमज दूर करु-दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण

मुंबई: भाजप व शिवसेनेची युती घट्ट असून खासदार गजानन कीर्तीकर यांचे काही गैरसमज असतील तर दूर करू. भाजप व शिवसेनेत जागावाटपावरून कोणताही वाद नाही. युती मजबूत आहे, असे वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा जाहीर आरोप केला होता. यावर आज पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिले. दीपक केसरकर म्हणाले, कीर्तिकर यांचे काही काम होत नसेल किंवा गैरसमज असतील तर ते चर्चेतून दूर केले जातील. लोकसभेसाठी युतीत २०१९ चाच फॉर्म्युला राहील. अंतिम निर्णय दोन्ही नेत्यांचा असेल. कोकणातून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत ते म्हणाले, मी राज्यातच खुश आहे.

दीपक केसरकर म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेसह इतर मुद्द्यांवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. विधानसभेतील ते सर्वोच्च नेते आहेत. तरीही संजय राऊत त्यांना अक्षरश: धमक्या देतात. त्यामुळे संजय राऊतांवर तातडीने हक्कभंगाची कारवाई झाली पाहीजे. त्यांच्यावर अद्याप हक्कभंग का झाला नाही, हा एक प्रश्नच आहे.