‘संधीसाधू’ :सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंनी घेतला समाचार

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘संधीसाधू’ असा केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले, “अखेर सत्याचा विजय झाला आहे. हा निकाल जनमताचा मान ठेवणारा आहे. घराणेशाही विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे. न्यायालयाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक दिली आहे. हा निर्णय मतदारराजाचा सन्मान करणारा आहे. हा शिवसेना वाचवण्यासाठी केलेल्या संघर्षाचा विजय आहे.”

ते पुढे म्हणाले, “यापुढे जनमताची फसवणूक करणारे पक्ष सत्तेसाठी आपला आत्मा विकण्याचे धाडस करणार नाहीत. सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी नितीमत्ता सोडणाऱ्यांनी नितीमत्तेची भाषा करू नये” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.