पुण्यात लवकरच लोकसभा पोटनिवडणूक, मात्र आघाडीत बिघाडी

अजित पवार यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

पुणे: पुण्यात लोकसभेच्या पोटनिवडणुका लवकरच लागण्याची चिन्हे आहेत. दिवंगत खासदार गिरिश बापट यांच्या रिक्त झालेल्या जागी ही पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ही निवडणूक होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. मात्र या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बिघाडी होण्याची शक्यता आहे.

अजित पवार म्हणाले की, पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझ्या आतल्या गोटातील माहिती आहे. ज्यांची जिथं जास्त ताकद आहे, तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं. पुण्यात कुणाची ताकद आहे हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले यावर ठरते. आमची ताकद किती आहे हे माहिती आहेच. महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी. मित्र पक्षालादेखील यावर बोलण्याचा अधिकार आहे.

पुणे लोकसभेसाठीच्या पोटनिवडणूकीची तयारी पुणे निवडणूक विभागाकडून पूर्ण झाल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीसाठी लागणारे मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम देखील पुण्यात दाखल झाल्या आहेत. भाजपकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरु झाली असली तरी राष्ट्रवादीने या जागेवर दावा केल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

खरंतर मागील अनेक वर्षांपासून पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसलाच दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसकडून अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर या तीन नावांची चर्चा आहे. राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे.