स्वराज्य २०२४ ला निवडणूक लढवणारच-छत्रपती संभाजीराजे

पुण्यात ‘स्वराज्य’ संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन

पुणे : स्वराज्य संघटना कुठल्याही परिस्थितीत २०२४ ला निवडणूक लढवणारच त्यामुळे तयारीला लागा. आपण निवडणुका लढू आणि जिंकू सुद्धा, असा विश्वास छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केला. ‘स्वराज्य’ संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडल त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचं पुण्यात आज उद्घाटन झालं. तसेच यावेळी शोभायात्राही काढण्यात आली. या अधिवेशनात बोलताना संभाजीराजे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ‘स्वराज्य’ संघटना स्थापना करण्याची कारणं, पुढची ध्येय, सध्याचं राजकारण आणि आगामी निवडणुकांवरही संभाजीराजे यांनी त्यांचे विचार मांडले.

ते म्हणाले, २ टक्के जरी शिवाजी महाराज यांच्यासारखा विचार केला तर आपण स्वराज्य सत्तेत आणू. प्रत्येक सुसंस्कृत नेता स्वराज्यात येणारच. घाबरायची गरज नाही, असंही संभाजीराजे म्हणालेत. महाराजांना देखील स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणी आल्या. पण महाराजांनी स्वराज्य स्थापन केलंच. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यचा मूलमंत्र आपल्याल दिला आहे. आजसुद्धा अनेक प्रस्थापित लोक आपल्याला त्रास देतायत. ती माजली आहेत. चूक त्यांची नाही कारण आपण त्यांना निवडून देतो, असं म्हणत संभाजीराजे यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली.