भारताला रक्त साठ्यात आत्मनिर्भर करण्याचे राज्यपाल कोश्यारी यांचे आवाहन

रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना राज्यपालांच्या हस्ते ‘संवेदना’ पुरस्कार प्रदान

मुंबई ,८ एप्रिल /प्रतिनिधी :- करोना महामारीच्या काळात भीतीमुळे लोकांनी रक्तदान कमी केले. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, मात्र रक्ताची आवश्यकता अधिक आहे. यास्तव रक्तदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांनी अधिकाधिक लोकांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करून भारताला रक्त साठ्याच्या बाबतीत आत्मनिर्भर करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

गेल्या दोन वर्षांत रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील 35 संस्थांना तसेच आरोग्यदूतांना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे अलीकडेच ‘संवेदना आंतरराष्ट्रीय जीवन रक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

संवेदना पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट्स अँड ऍक्टिविस्ट्स (निफा) या संस्थेने महाराष्ट्र आंत्रप्रेन्यूअर चेंबर या संस्थेच्या सहकार्याने केले होते.

कार्यक्रमाला निफाचे संस्थापक प्रितपाल  पनू , महाराष्ट्र आंत्रप्रेन्यूअर चेंबरचे अध्यक्ष अमेय पाटील, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विनायक टेम्भूर्णीकर, डॉ.भारती मोटवानी, राज्य शासनाचे सहसचिव सतीश जोंधळे व पुरस्कार विजेत्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

देशातील  रक्तपुरवठ्याच्या कमतरतेचा उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले की, रक्तदान क्षेत्रातील संस्थांनी मनःपूर्वक प्रयत्न केले, तर लोक रक्तदान करण्यास निश्चितपणे पुढे येतील. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) या संस्थेने तसेच संस्थेशी निगडीत आयुर्वेद डॉक्टरांनी रक्तदानाच्या बाबतीत राज्यात उत्कृष्ट काम केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

80 कोटी युवक; रक्तदाते 4 कोटी

भारताच्या 80 कोटी युवा लोकसंख्येपैकी केवळ 4 कोटी युवक स्वेच्छेने रक्तदान करतात. देशातील रक्तदानाची गरज 12 कोटी युनिट इतकी आहे त्यामुळे रक्तदानात देश स्वयंपूर्ण व्हावा व कुणीही रक्ताअभावी प्राण गमावणार नाही हे पाहणे गरजेचे असल्याचे ‘निफा’ या संस्थेचे संस्थापक प्रितपाल पनू यांनी सांगितले.

संवेदना मोहिमेअंतर्गत दि. २३ मार्च २०२१ रोजी शहीद दिनानिमित्त १४७६ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये १ लाखाहून अधिक पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्याची माहिती पनू यांनी दिली. त्याचबरोबर राज्यात ९७ शिबिरे झाली व ४१५० पिशव्या रक्त संकलन झाल्याचे अमेय पाटील यांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते ‘कृष्ण महिमा’ या गीता पठण व अर्थ निरूपण स्पर्धेतील विजेत्या इरावती वालावलकर, ओमिशा सिंह व आदित्य सुब्रमण्यम या लहान मुलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वंदेभारतम् स्पर्धेच्या विजेत्या चमूने गोंधळ नृत्याचे सादरीकरण केले.