शासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत – आ. रमेश बोरणारे

वैजापूर ,२४ मे  / प्रतिनिधी :- गोदावरी, शिवना, ढेकु, नारंगी-सारंगी, बोर या छोट्या मोठ्या नद्या असुन पावसाळ्यात जवळील गावांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाटबंधारे, वनविभाग, महसुल, कृषि विभाग व महावितरण या यंत्रणांनी मान्सुनपुर्व कामे वेळेत पुर्ण करावीत. तसेच नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र आराखडा करावा असे निर्देश आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी दिले. 

वैजापूर पंचायत समितीच्या सभागृहात तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती व तहसिल कार्यालयातर्फे तालुकास्तरीय खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार बोरनारे यांनी सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, उपविभागिय अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, गटविकास अधिकारी एच.आर. बोयनर, बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, उपविभागय  कृषि अधिकारी अशोक आढाव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पुरपरिस्थितीमध्ये नागरिकांना तात्पुरता निवारा, मुलभुत सोयी देण्यासाठी नगरपालिका व तहसिल विभागाने नियोजन करावे, एनडीआरएफची पथके आवश्यक त्या ठिकाणी पोहचवण्यासाठी खासगी बोटी, बोट चालक यांची फोन नंबरसह यादी तयार करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.‌ या बैठकीत उपविभागिय कृषि अधिकारी अशोक आढाव यांनी कृषि विभागाचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे क्षेत्र घटणार असुन मका पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे सांगत कपाशीच्या ६५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी ३.२५ लाख पाकिटे व मकाच्या ४५ हजार हेक्टरवरील लागवडीसाठी सहा हजार ७५० क्विंटल बियाणाचे कृषि विभागाने नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. पोकरा योजनेअंतर्गत १९ हजार ४३४ लाभार्थ्यांना ११९ कोटी रुपये डीबीटीद्वारे वितरित करुन राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याचे आढाव यांनी सांगितले. सुत्रसंचलन मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोडके यांनी केले. बैठकीला कृषि अधिकारी रवि उराडे, मुसने, गजेंद्र देशमुख,अशोक बबिनगे, पंकज ताजने, राजु थोरात, पंकज साठे, राजेंद्र साळुंके, भागिनाथ मगर, प्रशांत कंगले, रविंद्र कसबे उपस्थित होते.