वांजरगाव येथे गोदावरी नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थांबवा – ग्रामस्थांचे उपोषण

वैजापूर ,२४ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठी वांजरगाव येथे सुरू असलेला अनधिकृत वाळू उपसा त्वरित थांबविण्यात यावा या मागणीसाठी वांजरगाव येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतसमोर उपोषण सुरू केले आहे.

वांजरगाव येथील वेगवेगळ्या गट क्रमांकातुन शासकीय कामासाठी जवळपास बारा हजार ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मात्र, हा वाळू उपसा करत असताना शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले असून परवानगीपेक्षा अधिक वाळूचा उपसा होत आहे. याशिवाय अवजड वाहनातून वाळूची वाहतूक होत असल्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते निकामी होत आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

याशिवाय सरला बेट चे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनीही काही दिवसांपूर्वी वांजरगाव येथील संबंधित वाळू पट्ट्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसह भेट देऊन वाळू उपशाला तीव्र विरोध केला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी ही उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड यांना निवेदन देऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. असे असतानाही त्या ठिकाणी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे वांजरगाव येथील ग्रामस्थांनी बुधवारपासून ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्यास सुरुवात केली. प्रशासनाने याबाबत कुठलेही कार्यवाही न केल्यास उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.