पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली ; आंदोलकांची भेट घेण्यासाठी बारसू येथे जाणार

मुंबई, ५ मे  / प्रतिनिधी :-  बारसू रिफायनरीवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. बारसू ग्रामस्थांसह ठाकरे गटानेही बारसू रिफायनरीला विरोध केला आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 6 मे रोजी आंदोलकांची भेट घेण्यासाठी बारसू येथे जाणार आहेत, मात्र आता पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाने रानतळे येथे बैठकीचे नियोजन केले होते. बारसू गावात उद्धव ठाकरेंना रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची बैठक घेण्यास परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रिफायनरी समर्थक उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन संमतीपत्रही सादर करणार आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून स्थानिक ग्रामस्थांनी याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. उद्धव ठाकरे या आंदोलकांची भेट घेणार आहेत. राजापूरमध्ये विविध 51 संघटना, ग्रामपंचायत सरपंच, जमीन मालक, बागायतदार, व्यापारी असे हजारो समर्थक उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी नाणारसह बारसू परिसरातील शेतकरी व जमीनदार या प्रकल्पासाठीच्या जमिनीची संमतीपत्रे ठाकरे यांना सादर करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या रत्नागिरी दौऱ्याच्या दिवशी भाजप-शिवसेना शिंदे रिफायनरीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहेत. बारसू रिफायनरीच्या समर्थनार्थ महाआघाडीचा पलटवार मोर्चा रत्नागिरी हेलिपॅडपासून सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बारसूबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रकल्प चांगला असेल तर स्थानिकांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. सभेला परवानगी नाकारल्यावर ठाकरे गट काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यामुळे राजकारण तापू लागले आहे. काही लोक बारसू येथील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावर संजय राऊत यांनी बारसू  मधील आंदोलक स्थानिक आहेत, ते पाकिस्तानचे नाहीत, असे उत्तर दिले.