आदित्य ठाकरे उद्या वैजापुरात शिवसैनिकांशी सवांद साधणार

वैजापूर,२१ जुलै /प्रतिनिधी :- शिवसेना नेते, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे  वाहनाने शुक्रवारी वैजापूर मार्गे औरंगाबादला रवाना होत आहेत.या दौ-यात ते काही वेळासाठी शहरात थांबणार आहे. यावेळी ते येथील शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी तसेच  शिवसैनिकांसोबत ते संवाद साधणार आहेत. पंचायत समिती परिसरात हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी दिली.
महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिकांशी सवांद साधण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आजपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात ते प्रत्यक्ष सवांद साधणार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्शवभूमीवर आदित्य ठाकरे  यांची ही संवाद यात्रा समाजाच्या सर्व थरांतील जनता आणि शिवसैनिकांमध्ये नवी ऊर्जा , नवे चैतन्य निर्माण करणारी ठरणार आहे. तालुक्यातील शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या संभ्रमात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत कार्यरत पदाधिकारी व शिवसैनिकांसमोर पक्ष संघटनेचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या दौ-यात युवा सेनाप्रमुख  आदित्य ठाकरे पक्षात निर्माण झालेल्या बंडाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांशी प्रत्यक्ष सवांद साधणार आहेत. आदित्य ठाकरे यांचे शहरात आगमन होत असल्याने त्यांचे जोरदार स्वागत करण्याबरोबरच त्यांच्या समोर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी येथील पदाधिकारी व शिवसैनिक कमालीचे सक्रिय झाले आहेत.तालुकाप्रमुख सचिन वाणी यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिकांची नियोजन बैठक पार पडली.आदित्य ठाकरे यांचे दुपारी 2 वाजता शहरात आगमन होणार आहे. वैजापूर शहरात दाखल झाल्यानंतर ते सर्वप्रथम तालुक्याचे माजी आमदार स्व. आर.एम. वाणी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.त्यानंतर ते शिवसैनिकांशी सवांद साधतील.