प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी ​मेळावा ​८ मे  रोजी २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये

नवी दिल्ली,​५ मे ​/ प्रतिनिधी:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य भारत मिशन अंतर्गत देशातील तरुणांसाठी भवितव्याच्या संधींना चालना देण्याच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) ८ मे  रोजी देशभरातील २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळावा (PMNAM) आयोजित करणार आहे.

स्थानिक तरुणांना संबंधित शिकाऊ प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्थानिक व्यवसाय आणि संस्थांना या रोजगार उमेदवारी मेळ्याचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक कंपन्यांचा सहभाग पाहायला मिळेल. एका व्यासपीठाद्वारे, सहभागी संस्था संभाव्य शिकाऊ उमेदवारांशी संपर्क साधू शकतात, त्यांच्या पात्रतेनुसार जागेवरच प्रशिक्षणार्थींची निवड करू शकतात, तसेच तरुणांच्या उपजीविकेच्या संधींना बळकट करू शकतात.

इच्छुक उमेदवार  https://www.apprenticeshipindia.gov.in/  या संकेतस्थळावर भेट देऊन या मेळ्यात आपले नाव नोंदवू शकतात तसेच मेळ्याचे जवळचे ठिकाण शोधू शकतात. इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वी उत्तीर्ण किंवा कौशल्य रोजगार उमेदवारी प्रमाणपत्र असलेले किंवा आयटीआय प्रमाणपत्रधारक किंवा पदविकाधारक किंवा पदवीधर असलेले उमेदवार या प्रशिक्षणार्थी मेळ्यात अर्ज करू शकतात. उमेदवारांनी त्यांच्या स्वयंपरिचय माहितीच्या तीन प्रती, सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांच्या तीन प्रती, छायाचित्र असलेले ओळखपत्र (आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो संबंधित ठिकाणी सोबत आणणे आवश्यक आहे. मेळ्याच्या ठिकाणांची यादी रोजगार उमेदवारी मेळा पोर्टलवर देखील उपलब्ध आहे. (http://dgt.gov.in/appmela2022/ ). ज्या उमेदवारांनी या आधीच नावनोंदणी केली आहे त्यांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेळ्याद्वारे रोजगार उमेदवारी सत्रानंतर, उमेदवारांना नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (NCVET) – मान्यताप्राप्त प्रमाणपत्रे देखील मिळतील. यामुळे त्यांच्या रोजगारक्षमतेत सुधारणा होईल.

प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी देशभरात हे रोजगार उमेदवारी मेळे आयोजित केले जातात. या मेळ्यांमध्ये, निवडक व्यक्तींना प्रशिक्षणार्थी संधी दिली जाते आणि रोजगार उमेदवारी दरम्यान त्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी सरकारी निकषांनुसार मासिक मानधन मिळते. रोजगार उमेदवारी हे कौशल्य विकासाचे सर्वात टिकाऊ मॉडेल मानले जाते आणि स्किल इंडिया मिशन अंतर्गत याला मोठी चालना मिळत आहे.

सरकार दर वर्षी 15 लाख तरुणांना प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाद्वारे प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आस्थापना आणि तरुणांचा सहभाग वाढवणारा प्रधानमंत्री राष्ट्रीय रोजगार उमेदवारी मेळा (PMNAM) हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम सहभागी कंपन्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या विविध संधींबद्दल तरुणांमध्ये जागरूकता देखील वाढवत आहे.