जांबरगांवच्या संतप्त शेतकऱ्याने ट्रॅक्टरने रोखला समृध्दी महामार्ग !

महामार्गावरील अर्धवट नाल्यांमुळे कांदा चाळीत शिरले पाणी

वैजापूर ,​५​ मे  / प्रतिनिधी :- महामार्गावरील अर्धवट नाल्यामुळे कांदा चाळीत पाणी शिरल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांने थेट समृध्दी महामार्गावरील टोलनाक्यावर ट्रॅक्टर आडवा लावून रस्ता रोखल्याचा प्रकार गुरुवारी (ता.04) सायंकाळी जांबरगांव (ता.वैजापूर) शिवारात घडला. पोलिसांनी मध्यस्थी करून यापुढे पाणी येणार नाही असे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांने ट्रॅक्टर बाजूला घेतला.

गुरुवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी समृध्दी महामार्गावरून वाहत दोन्ही बाजूच्या शेतात शिरले. जांबरगांव टोल नाक्याजवळील सुनील भोसले, जनार्धन भोसले व देविदास साठे शेत गट क्रमांक 31 व 50 मधील शेतात पाणी शिरले. पाणी कांदा चाळीत शिरल्याने पाचशे क्विंटलपेक्षा जास्त कांद्याचे नुकसान झाले.त्यामुळे संतप्त झालेल्या देविदास साठे या शेतकऱ्यांने जांबरगांव टोलनाक्यावर ट्रॅक्टर आडवा लावून रस्ता रोखला.या प्रकाराने टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला.परिसरातील शेतकरी व नागरिक याठिकाणी जमा झाले. टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वैजापूर पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिस निरीक्षक विजय नरवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व शेतकरी देविदास साठे व राजेंद्र साठे यांच्याशी चर्चा केली. यापुढे महामार्गावरील नालीचे पाणी शेतात येणार नसल्याची हमी त्यांनी साठे यांना दिली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर साठे यांनी ट्रॅक्टर बाजूला घेतला.