सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांसाठी 7000 मेगावॅट वीजनिर्मितीमुळे ग्रामीण विकासाला चालना-महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक

छत्रपती संभाजीनगर ,२७  एप्रिल / प्रतिनिधी :-सौर ऊर्जेचा वापर करून 7000 मेगावॅट वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करायचा यासाठी शिंदे फडणवीस सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0’ मुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगला बदल घडविण्याबरोबरच ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन महावितरणचे स्वतंत्र संचालक आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत केले.
    ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0 हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतीच अभियानास व त्या अंतर्गत ‘मिशन 2025’ला सुरुवात झाली. त्यानुसार सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर 2025 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान 30 टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालविण्यात येतील. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व भरवशाचा वीजपुरवठा होईल. त्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होईल. राज्यात 45 लाख कृषी पंपधारक शेतकरी आहेत व त्या सर्वांसाठी आगामी काळात हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे.    

त्यांनी सांगितले की, या अभियानाच्या अंतर्गत राज्यात वीजनिर्मितीसाठी 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. ग्रामीण भागात हजारो रोजगार निर्माण होतील. सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन भाड्याने देऊन हेक्टरी सव्वा लाख रुपये वार्षिक भाडे मिळविण्याची शेतकऱ्यांना संधी मिळेल. हे भाडे दरवर्षी तीन टक्के दराने वाढणार आहे. तसेच सौर उर्जा निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीत सक्रीय सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून विकासकामांसाठी पाच लाख रुपये प्रोत्साहन निधी तीन वर्षांसाठी मिळणार आहे.    

ते म्हणाले की, या अभियानाचा शुभारंभ करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी काळात गावातील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, दवाखाना, पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालविण्यासाठी नियोजन करण्यास सरकारी यंत्रणेला सांगितले आहे. शेतकऱ्यांसाठी सौर उर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करताना निर्माण झालेल्या क्षमतेचा आगामी काळात संपूर्ण गावासाठी उपयोग होईल.    

ते म्हणाले की, शेतीसाठी सध्या सरासरी दीड रुपये प्रती युनिटने वीज पुरवठा होत असला तरी ती वीज महावितरणला सरासरी साडे आठ रुपये प्रती युनिट दराने मिळते. दरातील फरक राज्य सरकारचे अनुदान आणि उद्योगांसाठीच्या वीजदरावर लावलेला क्रॉस सबसिडीचा भार यातून भरून काढला जातो. सौर ऊर्जेद्वारे मिळणारी वीज सुमारे तीन रुपये तीस पैसे प्रति युनिट दरापर्यंत मिळणार असल्याने भविष्यात उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन उद्योग – व्यवसायांना स्पर्धात्मक दरात वीजपुरवठा होऊ शकेल.    

ते म्हणाले की, शेतीसाठी दिवसा आणि रात्री वीजपुरवठा होतो. रात्री सिंचन करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांना दिवसा भरवशाचा वीजपुरवठा व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात जून 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली होती. योजनेची अंमलबजावणी महावितरणमार्फत केली जाते. योजनेत आतापर्यंत 553 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत आणि त्यातून 230 कृषी फीडर्सवरील एक लाख शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पत्रकार परिषदेस महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे हेही उपस्थित होते.