वैजापूर बाजार समिती निवडणुकीत व्यापारी मतदारसंघात २ ​मताला  दीड ते दोन लाखांचा तर सोसायटीत ७ ते १० हजारांचा भाव !

अटीतटीच्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष

जफर ए.खान

वैजापूर ,२६ एप्रिल :- येत्या २८ तारखेला होणाऱ्या वैजापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून अत्यंत अटीतटीच्या होत असलेल्या या निवडणुकीत शिंदे- भाजप गट व महाविकास आघाडीचे पॅनल समोरासमोर उभे ठाकले आहे. दोन्ही पॅनलकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू असून बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना सुरू आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक राहिले असून मतदान खरेदीसाठी ‘भाव’ काढण्यात आले आहे. व्यापारी मतदारसंघात दोन मतांसाठी दीड ते दोन लाख, सहकारी संस्था मतदारसंघात एका मतासाठी ७ ते १० हजार व हमाल मापाडी मतदारसंघात ३ हजार रुपये ‘भाव’  निघाल्याची चर्चा सुरू आहे.

वैजापूर बाजार समितीत संचालक मंडळाच्या एकूण १८ जागा आहेत. त्यामध्ये सहकारी संस्था मतदार संघ 11 जागा, ग्रामपंचायत मतदारसंघ 4 जागा, व्यापारी मतदारसंघ 2 जागा व हमाल मापाडी मतदारसंघा 1 जागा आहे. सहकारी मतदारसंघ (1470), ग्रामपंचायत मतदारसंघ (1135), व्यापारी मतदारसंघ (162) तर हमाल मापाडी मतदारसंघात (320) असे एकूण 3087 मतदार आहेत. 

बाजार समितीच्या या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपची युती झाली असली तरी भाजपमधील एक मोठा गट महाविकास आघाडीसोबत गेला आहे. शिंदे गटाचे आ. रमेश पाटील बोरणारे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांच्यात युती झालेली असून माजी आमदार रामकृष्णबाबा पाटील यांचे चिरंजीव आप्पासाहेब पाटील यांनी त्यांच्याशी घरोबा केला आहे. तर भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, जिल्हा दुध संघाचे संचालक कचरू पाटील डिके, बाजार समितीचे माजी संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप, कैलास पवार ही भाजपची प्रमुख मंडळीं महाविकास आघाडीसोबत गेली आहे. आ. रमेश बोरणारे, डॉ. दिनेश परदेशी व आप्पासाहेब पाटील या तिघांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास पॅनल आणि माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे, अँड.आसाराम पाटील रोठे, काँग्रेसचे बाळासाहेब संचेती, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील  शेतकरी विकास पॅनल या दोन पॅनलमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत आहे. दोन्ही पॅनेलच्या मंडळींकडून जोरदार प्रचार सुरू असून जाहीर सभा व बैठका घेऊन मतदारांशी संपर्क साधला जात आहे. जेवणावळी ही सुरू असून मतदान खरेदी करण्यासाठी याद्या तयार करून पाकीट बनवली जात आहे. मतदानाचे भाव ही निघाले असून व्यापारी मतदारसंघात 2 मतांसाठी दीड ते दोन लाख रुपये, सहकारी संस्था मतदारसंघात 7 ते 10 हजार रुपये तर हमाल मापाडी मतदार संघात तीन हजार रुपये भाव निघाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

शिंदे गट – भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती व विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून याकडे पाहिले जात आहे. बाजार समितीच्या अटीतटीच्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.