माजी आमदार आर.एम.वाणी यांचे खंदे समर्थक आहात तर त्यांच्या सुनबाई विरोधात उमेदवार का दिला ? माजी आमदार चिकटगावकर यांचा विरोधकांना सवाल

महाविकास आघाडी व भाजप प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या मेळाव्याला प्रतिसाद 

वैजापूर ,२६ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे माजी शिवसेना आमदार स्व.आर.एम. वाणी यांना आपले नेते मानता व त्यांचे खंदे समर्थक म्हणता मग त्यांच्या सुनबाई अनिताताई वाणी यांच्या विरोधात उमेदवार का दिला ? असा सवाल माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी येथे आयोजित महाविकास आघाडी व भाजपप्रणित शेतकरी विकास पॅनलतर्फे आयोजित मेळाव्यात केला.

पदमावती लॉन्स येथे आयोजित या मेळाव्यास जेष्ठ नेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे, अँड.आसाराम पाटील रोठे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अविनाश पाटील गलांडे, बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील निकम, माजी उपनगराध्यक्ष अकील सेठ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अँड. प्रतापराव निंबाळकर, पंकज ठोंबरे, जे.के.जाधव, विशाल शेळके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, एल.एम.पवार, मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष उल्हास ठोंबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, अँड.आसाराम पाटील रोठे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, डॉ.राजीव डोंगरे, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

शेतकऱ्यांच्या विविध समस्या, शेतीमालाला मिळणारा कमी भाव, शेतकऱ्यांच्या मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासह तालुक्यातील विविध विकास प्रश्नांसंदर्भात या मेळाव्यात विचार मांडण्यात आले. तालुक्याचे माजी शिवसेना आमदार  स्व.आर.एम.वाणी हे कुशल प्रशासक होते. त्यांनी आपल्या कार्यकुशलतेने वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका व पंचायत समिती आदी संस्थांचा विकास केला. त्यांचे शिष्य व खंदे समर्थक असल्याचे म्हणता मग बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या त्यांच्या सुनबाई अनिताताई देविदास वाणी यांना बिनविरोध निवडून न देता त्यांच्या विरोधात उमेदवार कसा उभा केला ? असा प्रश्न उपस्थित करून माजी आमदार स्व.आर.एम.वाणी व माजी आमदार स्व. कैलास पाटील यांच्या फोटोचा प्रचारात वापर का करता असा सवाल ही यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला.