निर्मला इन्स्टिट्यूटतर्फे रोटेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्यास विहिरीसाठी आर्थिक सहाय्य

जल-जागरुकता:काळाची गरज ती गावा-गावात पोहचविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत – राजपूत 

वैजापूर ,२६ एप्रिल  / प्रतिनिधी :- “पाणी हेच जीवन आहे” परंतू अजुनही नागरिकांनी पाण्याचे महत्व ओळखले नाही. या जल जागरुकते साठी व पाण्याचे महत्व शहर व खेड्यापाड्यातील  नागरिकांनी ओळखावे व पाण्याचा थेंब अन थेंब वाचवावा यासाठी जल जागरुकता ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन बुधवारी सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिह राजपूत यानी तालुक्यातील रोटेगाव येथे “पाणी अडवा-पाणी जिरवा” याअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ‘पाण्याचे महत्व’ या विषयावर बोलताना केले.

वैजापुर येथील निर्मला इन्स्टिट्यूट या सामाजिक  बांधिलकी जपणाऱ्या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या संस्थेच्या प्रमुख नंँनसी रॉड्रिग्ज यांनी रोटेगाव येथील अल्प्पभुधारक शेतकरी श्रीमती छाया वाल्मिक बंगाळ यांना आर्थिक सहाय्य करुन त्यांच्या  मालकीच्या शेतात विहीर खोदण्यासाठी निर्मला इन्स्टिट्यूटमार्फत आर्थिक सहाय्य केले. यामुळे छाया बंगाळ या आपल्या शेतात भाजीपाला व इतर पिकांची लागवड करून उत्पन्न मिळवतील व  स्वावलंबी  बनतील.

रॉड्रिग्ज यांनी पाण्याचा थेंब अन थेंब साठवावा असे आवाहन यावेळी बोलताना केले. निर्मळ इन्स्टिट्यूट ही संस्था गावोगावी नदी नाल्यावर बांध  टाकून पावसाचे पाणी अडवते व पाणी अडवा- पाणी जिरवा हा कार्यक्रम राबवते असेही त्या म्हणाल्या. या प्रसंगी जेसीबी चे बारकू मुकदम, पंढरीनाथ बंगाळ, शेषराव काळे, दत्तू गुंड, वाल्मिकराव बंगाळ, दत्तू बंगाळ  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी छाया बंगाळ  यानी आभार मानले.