मला कर्णधार बनवण्यात धोनीची महत्त्वाची भूमिका -विराट कोहलीचे मत

नवी दिल्ली,
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळण्यासाठी धोनीनेच मदत केली, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. फिरकीपटू अश्विनसोबत इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे विराटने संवाद साधला. त्यावेळी तो बोलत होता.

जेव्हा मी भारतीय संघात आलो, तेव्हापासून मला शिकण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती. मैदानावर मी नेहमी धोनीच्या नजीक असायचो. मी माझ्या बर्‍याच कल्पना त्याला सांगायचो. त्यातल्या बऱ्याच तो नाकारायचाही. पण एखादी कल्पना आवडल्यास तो माझ्याबरोबर काही गोष्टींवर चर्चा देखील करत असे. मैदानात असताना त्याचे नेहमी माझ्यावर बारीक लक्ष असायचे. मी त्याच्याकडून शिकत राहिलो आणि माझ्या जिज्ञासेमुळे कदाचित त्याला असा विश्वास वाटला की माझ्यानंतर हा संघाचे नेतृत्व करू शकतो, असे विराटने सांगितले.
 
धोनी कर्णधार पदावरून पायउतार झाल्यावर लगेच मला कर्णधारपद मिळाले, असे लोकांना वाटते. पण मला असे वाटत नाही की निवडकर्त्यांनी मला अचानक भारतीय कर्णधार म्हणून निवडले असेल. कदाचित माझी निवड करण्याआधी त्यांनी धोनीला माझ्याबद्दल मत विचारले असणार. म्हणूनच मला विश्वास आहे की भारताचे कर्णधारपद मिळण्यात धोनीने महत्वाची भूमिका बजावली, असेही विराट म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published.