विराटसेना अपयशी… पहिल्या कसोटीत पराभव

चेन्नई : परदेशात विजय मिळवून आलेल्या भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात मात्र इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी भारतीय गोलंदाजाच नव्हे तर फलंदाजांनादेखील चांगली करता आली नाही. जॅक लीच आणि जेम्स अँडरसनच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजींनी हार मानली आणि शेवटच्या सत्रात सर्वबाद करत पहिल्या कसोटीत मोठा विजय नोंदवला.

Image


 इंग्लडने भारताला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले होते. मात्र, भारतीय संघ दुसऱ्या डावात १९२ धावाच करू शकला. त्यामुळे इंग्लंडने भारतावर २२७ धावांनी विजय नोंदवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. संघाचा कर्णधार विराट कोहली आणि शुबमन गिल यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. पहिल्या डावात द्विशकी खेळी साकारणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Image


 चौथ्या दिवसअखेर इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवर रोहित शर्मा अपयशी ठरला. जॅक लिचच्या गोलंदाजीवर तो १२ धावांवर त्रिफाळाचित झाला. त्यानंतर पाचव्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा अवघ्या १५ धावांची भर घालून तंबूत परतला. जॅक लीचने त्याला स्टोक्सकरवी झेलबाद केले. तर, शुबमन गिलला अँडरसनने बाद केले. गिलने ७ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेला भोपळाही फोडता आला नाही.

Image


 दुसऱ्या बाजूला विराटने अर्धशतक साकारत संघाला पराभवापासून वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला कोणाचीही साथ लाभली नाही. दुसऱ्या बाजूला असलेल्या अश्विनला लीचने ९ धावांवर बाद केले. काही धावांच्या फरकानंतर विराटही बाद झाला. बेन स्टोक्सने त्याचा त्रिफळा उडवला. विराटने ९ चौकारांसह ७२ धावा केल्या. इंग्लंडच्या गोलंदाजांना भारताच्या तळाच्या फलंदाजांना बाद करायला वेळ लागला नाही. इंग्लंडकडून लीचने चार, अँडरसनने तीन,आणि आर्चर, स्टोक्स आणि बेसने प्रत्येकी एक गडी बाद केला.