रोहित आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार : व्हीव्हीएस लक्ष्मण
नवी दिल्ली,
हिटमॅन रोहित शर्माकडे दडपणातही शांत राहून उत्तमरित्या परिस्थिती सांभाळण्याची क्षमता आहे. म्हणूनच तो इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वोत्तम कर्णधार आहे, असे कौतुकोद्गार भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने काढले. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चार वेळा ‘आयपीएल’चे विजेतेपद मिळवले आहे.
रोहित आणि लक्ष्मण आयपीएलच्या पहिल्या दोन हंगामात हैदराबाद डेक्कन चार्जर्सकडून खेळले होते. त्यावेळची आठवण लक्ष्मणने सांगितली. जेव्हा रोहित प्रथमच संघात आला तेव्हा तो अवघ्या २१ वर्षांचा होता. नुकताच तो ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळला होता. आयपीएलच्या पहिल्या हंगामात डेक्कन चार्जर्सची कामगिरी खराब झाली. त्यावेळेस रोहित मधल्या फळीत संघ दडपणात असताना फलंदाजीसाठी यायचा, असे लक्ष्मण म्हणाला.
दुसऱ्या हंगामात मात्र त्याचा आत्मविश्वास प्रत्येक सामन्यागणिक वाढत गेला. त्यावेळीच त्याच्यामधील नेतृत्वगुणही विकसित झाले. संघातील मुख्य खेळाडूंमध्ये त्याची गणना होऊ लागली. दडपणाखाली शांत चित्ताने मैदानातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे कौशल्य त्याला अवगत आहे. मुंबईमध्ये समावेश झाल्यानंतर त्याला नेतृत्वगुण दाखवण्याची संधी मिळाली आणि मग त्याने मागे वळून पाहिले नाही. म्हणूनच रोहित माझ्यासाठी आयपीएलमधील सर्वोत्तम कर्णधार आहे, असे लक्ष्मणने सांगितले.