जनता सोन्याच्या विटा मागत नाही; तर फक्त पाणी मागतेय तरीही देऊ शकत नाही-मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र

बीआरएस पुढचे सरकार बनवेल, आम्ही राष्ट्रीयकरण करू, सर्वकाही परत घेऊ

लवकरच बीआरएसचे कायमस्वरूपी कार्यालय महाराष्ट्रात सुरू होणार

छत्रपती संभाजीनगर ,२४  एप्रिल / प्रतिनिधी :-७५ वर्षे झाले देशाला स्वातंत्र्य मिळाले. शहरांमध्ये आठ दिवसांना पाणी येते. छत्रपती संभाजीनगर असो की, अकोला हिच स्थिती आहे. राज्यात अनेक नद्यांचा उगम होतो. महाराष्ट्र एक बलवान राज्य असून मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. असे असतानाही शहरांना, जनतेला पाणी देऊ शकत नाही का? जनता फक्त पाणी मागतेय सोन्याच्या विटा मागत नाही तरीही देऊ शकत नाही. या गोष्टी बदलायला हव्या की, नाही. असा प्रश्न भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर उर्फ के. चंद्रशेखर राव यांनी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगरातील जबिंदा मैदानावर आयोजित सभेत, पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बोलत होते. 

माझ्या वक्तव्याचा विचार करा; विसरून जाऊ नका
के. चंद्रशेखर राव म्हणाले, एक प्रश्न देशातील बुद्धीजीवी आणि माझ्या मनात सतावत आहे. भारत एक महान परंपरेचा देश आहे. पण देशाचे लक्ष्य काय आहे? भारत आपले लक्ष्य गमावून तर नाही बसला ना? हा प्रश्न मला सातत्याने पडत आहे. एक गोष्ट समजणे आवश्यक आहे की, मी जे काही सांगणार ते तुम्ही ऐकूुन येथेच विसरून घरी जावू नका. आपल्या शहरात, गावात जाल तेव्हा माझ्या वक्तव्यांचा विचार करा, लोकांना सांगा, चर्चा करा.

या गोष्टींवर उपचार व्हायला हवे
उद्योगधंदे बंद पडत आहेत. लाखो श्रमजीवी रस्त्यावर येत आहेत. देशात जातीवाद, धर्मवाद, लिंगभेद होत आहे. धनवान श्रीमंतच होत आहे तर गरीब गरीबच होत चालला आहे. हे कटू सत्य आहे. मी काही गोष्टी सांगत नाहीये. कुणी माना अथवा मानू नका ते कटू सत्यच आहे. या गोष्टींवर उपचार व्हायला हवे. आजाराला सुधारणारे डाॅक्टर असतात, समाजाला सुधारण्यासाठी बुद्धीजीवी असतात. आमचे वय होत आहे पण तुम्ही तरुन आहेत असेच खितपत राहणार का? असा प्रश्नही मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी उपस्थितीत करत आपल्या संकटांचा आपल्यालाच निपटारा करावा लागणार आहे. परकीय राष्ट्र आपल्या मदतीला येणार नाही. जेवढा उशीर आपण करू तेवढा अन्यायाचा सामना आपल्याला करावा लागेल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
महाराष्ट्रात रोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करतात. पंतप्रधान किंवा राज्यातील नेत्यांना काहीच देणे घेणे नाही. ते लोक वाघ आणून आपल्याला दाखवत आहेत. वाघासारखे शेतकरी मात्र, मरत आहेत पण सत्ताधारी लोक आफ्रिकेचे चित्ते आणि नामिबियाचे वाघ आपल्याला दाखवत आहेत त्यांना शेतकऱ्यांचे काहीच देणेघेणे नाही,” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केला.

यासाठीच बीआरएस पक्षाचा जन्म झाला
खूप पक्षाला जनतेने संधी दिली. मलेशिया, सिंगापूर या ठिकाणी परिवर्तन झाले. ७५ वर्षात जे झाले ते झाले आता देशाला बदलण्याची आवश्यकता आहे . त्यासाठीच बीआरएस पक्षाचा जन्म झाला आहे. निवडणुकीसाठी या पक्षाचा जन्म नाही, सर्वांचा विकास करण्यासाठी या पक्षाची निर्मिती आहे. जेंव्हा नवा पक्ष येतो तेंव्हा सरकारी यंत्रणा त्याच्या मागे लागते, पण घाबरण्याची आवश्यकता नाही. आपल्या लढाईत खरेपणा असेल तर आपण नक्कीच जिंकू, नागपूरमध्ये आपले कार्यालय सुरू आहे. इथेही आपण आपल्या मालकीचे कार्यालय खरेदी केले जाणार आहे.

धरणांची संख्या वाढवावी लागेल
अकोला, पुणे, छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणी नाही, वीज नाही. देशात ४१ कोटी एकर शेती आहे. त्यासाठी आणि पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट पाणी आहे. पण जनतेपर्यंत पोहचविण्याची मानसिकता राजकारण्यांची नाही. देशात सिंचन क्षमता वाढवायची असेल तर धरणांची संख्या वाढवावी लागेल. पाणी आपण निर्माण करू शकत नाही, ते देव देतो इतर देश त्याचा वापर, नियोजन सुक्षपणे करीत आहेत. आपण लक्षात घेत नाहीत. जर पाच वर्ष इथे बीआएस चे सरकार आले तर घरा घरात नळाला पाणी देण्याचे काम आम्ही करू. शेतकऱ्यांना मुबलक पाणी आम्ही देऊ जे आम्ही तेलंगणात दिले. वाहून जाणारे पाणी समुद्रात जावू दिले जाणार नाही, शेतात आणू. याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले.

महान देश भारताने आपले ध्येय गमावले आहे. पुढचे सरकार बीआरएसचे स्थापन होईल, त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीयीकरण होईल. सरळ बोटातून तूप निघत नसेल तर बोट वाकवावे लागेल. डिजिटल इंडिया हा एक विनोद बनला आहे. महाराष्ट्रात बीआरएसचे सरकार आल्यास प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. सर्व शेतकऱ्यांनी संघटित व्हावे. महाराष्ट्रात लवकरच बीआरएसचे कायमस्वरूपी कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.केसीआर म्हणाले की, भारत आपल्या ध्येयापासून भरकटला आहे. ध्येयाशिवाय देश कुठे पोहोचतो, हा प्रश्न आपल्यासमोर आहे. नव्या उमेदीने पुढे जायचे आहे.केसीआर म्हणाले की, पंतप्रधानांना विनंती आहे की दिल्लीत बांधलेल्या संसदेच्या इमारतीला बीआर आंबेडकरांचे नाव द्यावे.

मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, त्यांची जात ही शेतकऱ्यांची जात असावी. महाराष्ट्र सरकारने दलितबंधू योजना सुरू केल्यास महाराष्ट्र सोडू. दलितबंधू योजनेंतर्गत दलित तरुणांना रोजगारासाठी दहा लाख रुपये दिले जातात, ही रक्कम परत घेतली जात नाही. तेलंगणा सरकार प्रत्येक शेतकऱ्याला एकरी १० हजार रुपये देते, त्यामुळे महाराष्ट्र सरकारही ही योजना राबवू शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.केसीआर म्हणाले की, बीआरएसचे सरकार आल्यास राष्ट्रीयीकरण केले जाईल, सत्तेचे खाजगीकरण का केले जात आहे? १५० वर्षांपासून २४ तास वीज देण्यासाठी पुरेसा कोळसा देशात उपलब्ध आहे. विजेचे खाजगीकरण का केले जात आहे? कोणाची जहागीर  आहे? शेतकर्‍यांना जेवढे पाणी लागेल तेवढे पाणी उपलब्ध आहे, मात्र वाहणारे पाणी सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी बंद करावे लागत आहे. झिम्बाब्वेमध्ये साडेसहा हजार टीएमसी इतका जलसाठा आहे, आपल्या देशात असे किमान चार जलाशय असले पाहिजेत.पैठणच्या जायकवाडी पेक्षा(क्षमता १०० टीएमसी ) ६५ पट जलसाठा आहे.  आजच्या रॅलीत मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासोबत खासदार के केशव राव, जोगीनापल्ली संतोष कुमार, के केशव राव, रंजित रेड्डी, आमदार मधुसूदनाचारी, देशपती श्रीनिवास, माजी मंत्री कडियाम श्रीहरी, आमदार बालकासुमन, माजी मुख्य सचिव सोमेश्वर कुमार, हरिनाथ कुमार, माजी मुख्य सचिव सोमनाथ कुमार आदी उपस्थित होते. 

तुमच्यातील नेते आम्हाला बनवायचे आहेत
तेलंगणात आम्ही निवृत्त मुख्य सचिवांना सोबत घेऊन विकास केला आहे. इथे का होत नाही ? महाराष्ट्रात हा उद्देश पूर्ण करण्यासाठी काम करीत आहोत. तुम्हीं जिल्हा परिषद, पंचायत सदस्य , आमदार, खासदार व्हा मोठ्या नेत्याची आम्हाला गरज नाही. तुमच्यातील नेते तयार करण्याचे काम करणार आहे. इथले उपमुख्यमंत्री म्हणतात तुमचे महाराष्ट्रात काय काम ? तुम्हीं तेलंगणा सांभाळा मी सांगितले मी तेलंगणा सांभाळला आहे. यामुळे इथे आलो आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव

तेलंगणात शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज देऊन मुख्यमंत्री केसियार छत्रपतीचे काम करीत आहेत. महाराष्ट्रात छत्रपतिचे नाव घेऊन राजकारण सुरू आहे. जनतेला मूर्ख बनविण्याचे काम सुरू आहे. केशीआर यांनी सांगितले तेलंगणा प्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करा मी येणार नाही. पण यांनी त्यावर ब्र शब्द काढलेला नाही. महाराष्ट्रीय शेतकरी आता पेटून उठला आहे . नेत्यांनी आमाप पैसा कमावण्याचा धंदा सुरू केला आहे. आता हे थांबले पाहिजे, कारण आता महाराष्ट्रात केसीआर आले आहेत. आता तुमची खैर नाही. महाराष्ट्रात हे मॉडेल चालणार आहे. केसीआर म्हणाले की, संविधान 70 वर्षांपूर्वी लागू झाले, अनेक पक्ष जिंकले, पराभूत झाले, सरकार बदलले पण आजपर्यंत दलित गरीब असणे ही आपल्या सर्वांसाठी शरमेची बाब आहे. या परिस्थितीत बदल व्हायला हवा.शेतकऱ्यांच्या तेरा महिन्यांच्या संघर्षानंतरच हा कायदा रद्द करण्यात आला. देशात उच्च दर्जाचे परिवर्तन झाले पाहिजे. या देशात रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे भारतात बदल आवश्यक आहे.

या नेत्यांचा बीआरएसमध्ये प्रवेश
बीआरएस पक्षाची राज्यातील ही तिसरी सभा आहे. यापूर्वी नांदेडमध्ये दोन सभा पार पडल्या होत्या. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ मतदारसंघातील नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्याने छत्रपती संभाजीनगरच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळवलेले कदीर मौलाना,  गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने आणि त्यांचे सुपुत्र संतोष माने, यांच्यासह वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पुतणे अभय पाटील चिकटगावकर,  बाळासाहेब सानप  यांच्यासह माजी नगरसेवकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. 

सभेची जंगी तयारी

केसीआर यांच्या सभेच्या निमित्ताने शहरात सर्वत्र पोस्टर्स, पताका, गुलाबी ध्वज फडकविण्यात आले.शहर गुलाबी रंगात रंगले होते. शहरभरात होर्डिंग्स, बॅनर्स आणि झेंडे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्यात तेलंगणा राज्याची छाप दिसून आली