प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत औरंगाबाद शहराचे नामांतर नाही :उच्च न्यायालयात सरकारची हमी

छत्रपती संभाजीनगर,२४एप्रिल /प्रतिनिधी :- नामांतराची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच विविध शासकीय कार्यालयांत, शासकीय कामकाजात औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आला असल्याचा आक्षेप आज याचिकाकर्त्याचे वकील सईद शेख यांनी घेतला असता न्यायालयाने केलेल्या विचारणे अंती अॅडव्होकेट जनरल यांनी प्रक्रीया पूर्ण झाल्याशिवाय छत्रपती संभाजीनगर नावाचा उपयोग केला जाणार नसल्याची हमी आज मुंबई उच्च न्यायालयात दिली.

महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नामांतराच्या विषयावर केंद्र सरकारने अखेर मोहर लावली होती. केंद्राने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्यात आली. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात सय्यद मोईनोद्दीन इनामदार, हुसैन पटेल, मुकुंद गाडे (बीड), अंजारोद्दीने कादरी (पैठण) व इतरांनी ॲड सईद एस शेख यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात ४ वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या आहेत. त्यावर आज सुनावणी झाली. अॅड् सईद यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पोस्ट आॅफीस, शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण) यांनी छत्रपती संभाजीनगर असे नाव वापरणे सुरु केले आहे. त्यावर न्यायालयाने अॅडव्होकेट जनरल विरेंद्र सराफ यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट केले की, अधिकृतरित्या संबंधित कार्यालयांना निर्देश देण्यात येतील की प्रक्रीया सुरु असेपर्यंत शहराचे नाव बदलण्यात येऊ नये. पुढील सुनावणी ७ जूनला अपेक्षीत आहे.