हिंगोली जिल्ह्यातील शहीद जवानाच्या वीरमातेस सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन मदत

विशेष बाब म्हणून तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश

मुंबई, दि.23 : जम्मू काश्मीर मध्ये 2002 साली शहीद झालेले हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील जवान कवीचंद परसराम भालेराव (बीएसएफ) यांच्या मातोश्री रुख्मिनबाई भालेराव यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी एक विशेष बाब म्हणून ‘आऊट ऑफ द वे’ जाऊन मदत केली आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेतील दारिद्रय रेषेची अट व वयोमर्यादा या दोन्ही अटी शिथिल करत त्यांना 4 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासन देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांच्या सदैव पाठीशी असून त्यांच्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नसल्याचे यावेळी श्री. मुंडे म्हणाले. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत श्रीमती रुख्मिनबाई भालेराव यांना तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याबाबत हिंगोलीचे जिल्हाधिकारी तसेच समाज कल्याण सहायक आयुक्त यांना शासन निर्णयाद्वारे आदेशित करण्यात आले आहे.

औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान शहीद कवीचंद परसराम भालेराव यांना ०६ जुलै २००२ रोजी अनंतनाग, जम्मू काश्मीर येथे वीरमरण आले होते. त्यांच्या पश्चात त्या वीरमातेवर भूमीहीन असल्याने हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती.

या बाबींचा विचार करत वीरमाता श्रीमती रुख्मिनबाई भालेराव यांना जमीन उपलब्ध करून देण्यासाठी योजनेतील शासन निर्णय १४ ऑगस्ट २०१८ मधील दारिद्र्य रेषेखाली असल्याची अट व वयाची अट या दोन्हीही अटी या एका प्रकरणाबाबत एक विशेष बाब म्हणून शिथिल करून भालेराव कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी श्री. मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाला निर्देश दिले होते.

दरम्यान श्रीमती रुख्मिनबाई भालेराव यांना तातडीने जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, वीरमाता रुख्मिनबाई भालेराव यांनी व भालेराव कुटुंबियांनी श्री.मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.