पक्ष फोडून तर बघा! आम्ही आमची भूमिका घेऊ : शरद पवार यांचा इशारा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची घेतली भेट

अमरावती ,२४ एप्रिल  / प्रतिनिधी :- कोणी पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं, आम्ही आमची भूमिका घेऊ, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेविषयी चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. अदानी प्रकरणात विरोधी पक्ष जेपीसी स्थापन करण्याची भूमिका घेत असतील तर मी त्याला विरोध करणार नाही, त्यांच्या सोबत असेन, असाही शरद पवार यांनी पुनरुच्चार केला.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावर पवार म्हणाले, ‘‘प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कर्नाटक निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली आहे. कर्नाटकात ते काही जागा लढवत आहेत, राष्ट्रवादीही काही जागा लढवत आहे. आमची यादी त्यांना दिली आहे, ते यादी देतील त्यावेळी सविस्तर चर्चा करता येईल.’’

शरद पवार रविवारी अमरावतीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यासंबंधी बोलताना शरद पवार म्हणाले की, जर कोणी पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं. आम्ही आमची भूमिका घेऊ.’’ यातून एकप्रकारे अजित पवार आणि इतरांना अप्रत्यक्ष इशाराच दिला असल्याचे राजकीय जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.